"शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस, साखर निर्यातीत भारत जगात अव्वल"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:43 AM2022-09-19T06:43:54+5:302022-09-19T06:44:31+5:30

द डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक साखर परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली

India tops the world in sugar exports and Maharashtra ranks third | "शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस, साखर निर्यातीत भारत जगात अव्वल"

"शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस, साखर निर्यातीत भारत जगात अव्वल"

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
पुणे :  साखर निर्यातीत भारत जगात अव्वल ठरला आहे. साखरेच्या निर्यातीत आपण विक्रम केला असून, दुसरा क्रमांक ब्राझील देशाचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र राज्य आहे. इतर देशांना मागे टाकून एका राज्याने ही कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा हादेखील एक विक्रम झाला आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

द डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक साखर परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याचेही त्यांनी नमूद केले. गायकवाड म्हणाले, साखर उत्पादनात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपण ११२ लाख टन साखर निर्यात केली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ७५ लाख टनांचा आहे. साखर धंद्याला सोन्याचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांनाही पैसा मिळत आहे. आता शनिवारपर्यंत (दि. १७) आपण शेतकऱ्यांच्या खात्यात ४२ हजार ६०० कोटी रुपये दिले आहेत.

साखर कारखाने होत आहेत इंधनाचे कारखाने
इथेनाॅल निर्मितीवरदेखील आपला भर आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यात पुढे आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. तसेच साखर कारखान्यातून पोटॅश निर्मितीही केली जात आहे. साखर कारखाने इंधनाचे कारखाने म्हणून पुढे येऊ लागले आहेत. जगातील साखरेतील आयएसओचे केंद्र महाराष्ट्रात यावे यासाठी आता पुढाकार घ्यायला हवा, असे गायकवाड म्हणाले.

इथेनाॅल निर्मितीवर भर द्यावा - पवार
साखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनाॅल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा. साखर धंद्यात अधिक संशोधन व्हावे आणि त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. साखर उत्पादनातील संशोधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी. आतापर्यंत तशी तरतूद केलेली ऐकिवात नाही. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी, अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: India tops the world in sugar exports and Maharashtra ranks third

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.