बालसंरक्षण व विश्वशांतीसाठी सायकलवरून भारत दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 08:01 PM2018-06-18T20:01:16+5:302018-06-18T20:01:16+5:30
बालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, पॉस्को कायद्याविषयक मार्गदर्शन, अत्याचारात बळी बडलेल्या पीडितांचे मनोबल वाढवणे आणि बालकांवर अत्याचाराबाबत जागरुकता निर्माण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
पुणे : बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे. लोणी स्टेशन बाहेर झोपलेल्या एक वर्षाच्या मुलीला उचलून नेत तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याची अतिशय संतापजनक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे बालसंरक्षण आणि विश्वशांतीसाठी पुण्यातील दोन तरुणांनी सायकलवरून भारत दौरा सुरू केला आहे. सायकलप्रेमी महेश क्षीरसागर आणि आकाश अडसूळ अशी या देन सायकलप्रेमी व भारत दौऱ्यातील युवकांची नावे आहेत. सुमारे ११ हजार किलोमीटरचा प्रवास करून दोघे पुन्हा पुण्यात परतणार आहे.
रविवारी सकाळी शनिवारवाडा येथून दोघांनीही आपल्या या मोहिमेला सुरूवात केली. विश्वशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यशराज पारखी आणि मुस्कान संस्थेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून हा मोहिमेची सुरुवात करण्यात आली. देशातील २० राज्यांतून त्यांचा प्रवास होणार असून १५० दिवसांत ही मोहीम पूर्ण करणार असल्याची माहिती महेश क्षीरसागर यांनी दिली.
अडसूळ म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे या घटनांचा निषेध करीत बाल लैगिंक अत्याचाराला विरोध करण्यासाठी तसेच जगात शांतता नांदावी यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. प्रवासामध्ये आम्ही ठिकठिकाणी शाळा आणि कॉलेजला भेटी देणार आहोत. त्याठिकाणी बालकांसाठी प्रशिक्षण शिबिरे, पॉस्को कायद्याविषयक मार्गदर्शन, अत्याचारात बळी बडलेल्या पीडितांचे मनोबल वाढवणे आणि बालकांवर अत्याचाराबाबत जागरुकता निर्माण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.