भारतात भविष्यात दोनहून अधिक डोस द्यावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:43+5:302021-06-26T04:09:43+5:30

डेल्टा प्लस जास्त धोकादायक : मिक्स अँड मॅचचा प्रयोग प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : डेल्टा प्लस व्हेरियंटने जगभरात दहशत निर्माण ...

India will have to give more than two doses in future | भारतात भविष्यात दोनहून अधिक डोस द्यावा लागणार

भारतात भविष्यात दोनहून अधिक डोस द्यावा लागणार

Next

डेल्टा प्लस जास्त धोकादायक : मिक्स अँड मॅचचा प्रयोग

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : डेल्टा प्लस व्हेरियंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. लसींची परिणामकारकताही या व्हेरियंटमुळे कमी होत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून भारताला भविष्यात दोनहून अधिक डोस देण्याचा विचार करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे केवळ एकाच लसीचे तीन डोस न देता ''मिक्स अँड मॅच'' करावे लागेल. दोन डोसमधील अंतर कमी करण्याबाबत गांभीर्याने पावले उचलावी लागतील. कोरोनामुक्त होऊन गेलेल्या नागरिकांना एकच डोस पुरेसा ठरू शकतो, अशा स्वरूपाचा अभ्यास आयसीएमआरने नुकताच प्रसिद्ध केला आहे. केवळ एका डोसने त्यांना कोरोनापासून संरक्षण मिळेल का, हाही अभ्यासाचा विषय आहे.

विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, ''कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना लसीचा एकच डोस द्यावा, याबाबत आयसीएमआरने एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीला लस दिल्यावर जितक्या अँटीबॉडीज तयार होतात, त्या तुलनेत कोरुना होऊन गेलेल्या व्यक्तीमध्ये एका डोसनंतर दुप्पट अँटीबॉडीज तयार होतात, असे शास्त्रीय अभ्यास सांगतो. मात्र, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात तर तीव्र स्वरूपाचा कोरोना झालेल्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडी तयार होत असल्याचे समोर आले आहे. भारतात 80 ते 85 टक्के लोकांना सौम्य ते मध्यम स्वरूपाचा कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे केवळ एका डोसने त्यांना कोरोनापासून संरक्षण मिळेल का, हा अभ्यासाचा विषय आहे.''

----

लसींच्या बदलत्या धोरणाबाबत पूर्णतः शास्त्रज्ञ किंवा सरकारला दोष देता येणार नाही. आजवर झालेले संशोधने कोरोना विषाणूच्या युके व्हेरियंटनुसार झाले. दुसऱ्या लाटेमध्ये डेल्टा व्हेरियंटने धुमाकूळ घातला. विषाणूमधील नवीन म्युटेशनमुळे दोन डोसमधील अंतर कमी करावे लागू शकते. युके आणि अमेरिकेमध्ये दोनहून अधिक डोस देण्याबाबत विचार सुरू आहे. डेल्टा प्लस अधिक धोकादायक आहे. लसींची याविरुद्धची परिणामकारकता कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात लसीचे दोनहून अधिक डोस द्यावे लागतील किंवा लसीमध्ये डेल्टा व्हेरियंटचे स्पाईक प्रोटीन वापरावे लागेल. लसीचे स्वरूप बदलणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्या तुलनेत डोस वाढवणे सोपे ठरेल. पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये याबाबत संशोधन होण्याची शक्यता आहे.

डेल्टा प्लसने संपूर्ण जगाची भिती वाढवली आहे. इस्राईलमध्ये 90 टक्के लसीकरण पूर्ण होऊनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात तर आत्तापर्यंत केवळ 25 टक्के लोकांचेच लसीकरण झाले आहे. दुसरी लाट ओसरल्यासारखी वाटत असली तरी सध्या आपण अत्यंत नाजूक टप्प्यावर उभे आहोत. साथ रोखण्याच्या दृष्टीने भविष्यात मल्टिपल डोसचा भारताला विचार करावा लागू शकतो.

- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ञ

----

युरोप, अमेरिकेमध्ये कोरोना होऊन गेला किंवा नाही हे न पाहता सरसकट लसीकरण केले जात आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात संरक्षण मिळण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतातही यापुढील प्रत्येक धोरण डेल्टा प्लस व्हेरियंटचा विचार करून ठरवावे लागेल. जगभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा इन्फेक्शन रेट आठ ते नऊ टक्के आहे. तसेच मृत्यूदरही जास्त प्रमाणात दिसून येत आहे. भारतात भविष्यात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढल्यास दोनहून अधिक डोस देण्याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे केवळ एकाच लसीचे तीन डोस न देता ''मिक्स अँड मॅच'' करावे लागेल. याबाबत स्पेनमध्ये सहाशे लोकांवर चाचणी घेतली आहे. चांगले परिणाम समोर आले असून २० लाख लोकांना फायजर आणि ॲस्ट्राझेनिका लसीचे डोस दिले जाणार आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंटचा विचार करता दोन डोसमधील अंतरही सहा ते आठ आठवड्यांपर्यंत कमी करावे लागू शकते.

- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ

Web Title: India will have to give more than two doses in future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.