जपानमध्ये कोरोनावर भारतीय आयुर्वेद काढा वापरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:49+5:302021-04-14T04:11:49+5:30
कोरोना या महामारीवर कोणतेही औषध नसल्यामुळे जगभरात विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. जपानने याकामी जास्तीत जास्त नैसर्गिक, रसायनांशिवाय ...
कोरोना या महामारीवर कोणतेही औषध नसल्यामुळे जगभरात विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येत आहे. जपानने याकामी जास्तीत जास्त नैसर्गिक, रसायनांशिवाय उपचारांना पसंती दिली आहे. ओसाका प्रांतातील इजुमियोत्सु शहराचे महापौर केनिची मिनामिडे यांनी नुकतेच ऑनलाईन चर्चासत्र घेतले. त्यात त्यांनी पुणे शहरातील नामवंत वैद्य सुकुमार सरदेशमुख यांना सहभागी करून घेतले. सरदेशमुख यांनी संशोधनांतील तयार केलेल्या आयुर्वेदिक काढ्याचा चांगला उपयोग होत असल्याचे नमूद करून त्यांनी कोविड आणि कोविडोत्तर काळात या काढ्याचा आम्ही वापर करणार आहोत, असे सांगितले. यावेळी जपान सरकारचे डॉ. मोटोको सातो आणि डॉ. माकिकी सातो, हेही सहभागी झाले होते.
याबाबत वैद्य सुकुमार सरदेशमुख म्हणाले की, आमच्या कंपनीने तयार केलेला काढा कोणीतरी त्यांना पाठवला तो गुणकारी सिध्द होत असल्याने, हा निर्णय घेण्यात आला असेल, याचा आम्हाला अभिमान आहे. तुळस, अश्वगंधा, सुंठ, दालचिनी, लवंग, गुळवेल, ज्येष्ठमध या औषधी वनस्पतींचा त्यात वापर करण्यात आला आहे. एकात्मिक उपचार पध्दतीत हा काढा वापरला जाणार आहे, असेही ते म्हणाले.