भारतीय अभिजात नृत्य कधीही नामशेष होणार नाही : डॉ. सुजाता नातू (विशेष मुलाखत)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:28+5:302021-03-28T04:10:28+5:30

----------------------------------------------- * विद्वत्तापूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही नृत्यकलेकडे कशा वळलात? -बडोद्यासारख्या सांस्कृतिक आणि सर्वच क्षेत्रात प्रगत असलेल्या शहरात माझा जन्म ...

Indian classical dance will never be extinct: Dr. Sujata Natu (Exclusive Interview) | भारतीय अभिजात नृत्य कधीही नामशेष होणार नाही : डॉ. सुजाता नातू (विशेष मुलाखत)

भारतीय अभिजात नृत्य कधीही नामशेष होणार नाही : डॉ. सुजाता नातू (विशेष मुलाखत)

Next

-----------------------------------------------

* विद्वत्तापूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही नृत्यकलेकडे कशा वळलात?

-बडोद्यासारख्या सांस्कृतिक आणि सर्वच क्षेत्रात प्रगत असलेल्या शहरात माझा जन्म झाला. सयाजीराव गायकवाड यांच्या घराण्याशी कुटुंबाचे चांगले संबंध होते. जगात जे जे चांगले ते ते बडोद्यात पाहिजेच हा त्यांचा दृष्टीकोन आणि कलेला मिळणा-या राजाश्रयामुळे शिक्षण, कला, संस्कृती बडोद्यात खूप चांगली फलद्रृप होत होती. माझ्या दोन बहिणी गायन कलेत उत्तमरित्या पारंगत होत्या. पण माझा ओढा हा नृत्याकडे अधिक असल्याचे लक्षात आल्यावर काकांमुळे नृत्याचे धडे गिरवण्याची परवानगी मिळाली आणि स्वत:ला नृत्यामध्ये झोकून दिले.

* मग, लग्नानंतर ही कला कशी जपलीत? काही विरोध झाला का?

-नाही, विरोध असा झाला नाही. लग्नानंतर पती सुरेश नातू यांची बदली कलकत्त्याला झाली. तिथे कलेला पोषक वातावरण होतेचं. मी घरातच नृत्याची तालीम करीत असे. सासरच्यांकडून नृत्य कलेच्या संवंर्धनाबाबत प्रोत्साहन मिळत होते. परंतु, जाहीर व्यासपीठीय अविष्काराला काहीसा विरोध होता. मात्र नृत्याला प्रतिष्ठा मिळाल्यानंतर तो विरोधही मावळला.

* पुण्यात स्थायिक झाल्यानंतर नृत्यकलेचा प्रवास कसा सुरू झाला?

- ज्यावेळी पुण्यात आले. तेव्हा नृत्यकलेला म्हणावी तितकी प्रतिष्ठा नव्हती. नृत्य प्रशिक्षण देणारे केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वर्ग पुण्यात चालत होते. पंरतु त्याला शैक्षणिक चौकट नव्हती. ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी जाऊन नृत्यकलेचे सौंदर्य उलगडून दाखविणारी सादरीकरणात्मक व्याख्याने दिली. अगदी शालेय आणि विद्यापीठ स्तरावर प्रयत्न केले. त्या प्रयत्नानांना यश आल्याने कथक नृत्याला समाजमान्यता मिळवून देण्याचा एक टप्पा पूर्ण झाला. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या विद्यापीठ स्तरांपासून ते शालेय स्तरापर्यंत नृत्यांचे अधिकृत शिक्षण दिले जात आहे. याचे मनापासून समाधान वाटते.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *कलेमध्ये प्रयोगशीलता किती महत्वाची वाटते?

-गुरूकडून जे कलेचे ज्ञान शिष्याला मिळते. त्या ज्ञानामधून शिष्याला स्वत:ला सिद्ध करायचे असते. त्यासाठी प्रयोगशीलता महत्वपूर्ण ठरते. यामध्ये गुरूचे अनुकरण न करता पारंपारिक चौकटीत राहून नवनवीन प्रयोग करणे गरजेचे असते. मी कथकमध्ये अनेक प्रयोग केले. उदा: कीर्तन-कथक, लावणी कथक. शास्त्रीय नृत्याच्या मूळ गाभ्यालाकुठेही धक्का न लावता केलेल्या सादरीकरणाचे सर्वांनीच कौतुक केले. याला एकप्रकारे ‘फ्यूजन’च म्हणता येईल.

* पण, सध्याच्या नृत्याविष्कारांमध्ये ’फ्युजन’च्या नावाखाली पाश्चिमात्य शैलीचा अधिकांश वापर केला जातो, त्याविषयी काय वाटते?

- सध्याचे फ्युजन पाहिले की आपली मूळ नृत्य कला लयास जाते की काय अशी पुसटशी शंकेची पाल मनात चुकचुकून जाते. परंतु, अभिजात नृत्य कलेला लाभलेली दीर्घ परंपरा आणि त्या नृत्य कलेचा पाया, खोली पाहिली की नृत्यरुपी तळपत्या सुयार्पुढे आलेले हे तात्पुरते काळे ढग असून, ते बाजूला सारून नृत्याचा सूर्य पुन्हा एकदा लखलखून त्या काळ्या ढगांमागून पुढे येईल, असा विश्वास देखील वाटतो.

* आजच्या काळात रिअँलिटी शो मुळे पालकांचा कल पाश्चिमात्य नृत्यशैलीकडे वाढत चालला आहे, मग शास्त्रीय नृत्याचे भवितव्य काय ?

-नृत्यासाठी साधना महत्वाची असते. झटपट मिळविलेल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. भारतीय नृत्याला अभिजात परंपरा आहे. इतकी वर्षे उलटली तरी ती आजही टिकून आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्याला मरण नाही. ते चिरंतन टिकेल. तंत्रज्ञान आणि पाशात्य संगीताकडे आकृष्ट होणारी पिढी ही सध्याच्या मूळ भारतीय नृत्य कलेपुढची आव्हाने आहेत हे जरी मान्य असले तरी या सर्व आव्हानांवर मात करुन भारतीय अभिजात नृत्य कलेला पहिल्यासारखे दिवस येतील, या कलेला परत पूर्वी सारखीच मान्यता मिळेल.

* नृत्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य वेचलेत, वयाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहाताना काय भावना आहे?

- माझ्या मनात अत्यंत समाधानाची भावना आहे. शिक्षणाचा संबंध हा नेहमीच अर्थार्जनाशी जोडला गेला आहे. नृत्य कलेच्या माध्यमातून अर्थार्जन देखील करणे शक्य आहे, हे सिद्ध झाले आहे. आज नृत्याचे शिक्षण घेतलेली जवळपास प्रत्येक विद्यार्थिनी कोणत्या ना कोणत्या शैक्षणिक संस्थेशी जोडलेली असून, ती देखील नृत्य कलेचा वारसा पुढे नेण्यात खारीचा वाटा उचलते आहे. हे पाहिल्यानंतर अजून काय हवं आहे. कृतार्थ झाल्यासारखं वाटत आहे.

---------------------------

Web Title: Indian classical dance will never be extinct: Dr. Sujata Natu (Exclusive Interview)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.