भारतीय क्रिकेटपटूंची जर्सी प्लास्टिकच्या सूतापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:51 PM2018-06-30T17:51:59+5:302018-06-30T18:04:26+5:30
एक लिटर पाण्याच्या ३३ रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून एका खेळाडुच्या जर्सीची निर्मिती....
पुणे : प्लास्टिकच्या वापराच्या दुष्परिणामांचा गांभीर्याने विचार करून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. मात्र, प्लास्टिकच्या पुनर्वापरामधून अनेक गोष्टी सहजपणे करता येणे शक्य आहे. प्लास्टिकचे विघटन करत निर्मिलेल्या सूतापासून टी-शर्ट, कापडी पिशवी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निळ्या रंगातील जर्सी परिधान करून मैदानावर उत्कृष्ट खेळ करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा पोषाख हा देखील प्लास्टिकच्या सुतापासूनच घडविलेला आहे.
प्लास्टिक कचरा ही सध्याची सर्वांत मोठी समस्या असून, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशातून राज्य सरकारने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. मात्र, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसली तरी प्लास्टिक वस्तुंचा शंभर टक्के पुनर्वापर करता येणे शक्य आहे, असा दावा इंडियन प्लास्टिक इन्स्टिट्यूटचे समीर जोशी यांनी केला. प्लास्टिक बाटल्यांचे संकलन करून त्याचे विघटन करत सूत निर्मिती करणारा कारखाना कोईमत्तूर येथे आहे. या कारखान्यातच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंची जर्सी तयार केली जाते. एक लिटर पाण्याच्या ३३ रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून एका खेळाडुच्या जसीर्ची निर्मिती केली जाते , असे त्यांनी सांगितले.
एक लिटरच्या आठ रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून लहान मुलांच्या टी-शर्टची निर्मिती करण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे दहा हजार टी-शर्टचे प्लास्ट इंडिया फाउंडेशनने शालेय विद्याार्थ्यांना वाटप केले आहे. तर, एक लिटरच्या दहा रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून कापडी पिशवी तयार केली जाते. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी दोन लाख रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून ७० इंची रुंद आणि ९७ इंची टी-शर्टची निर्मिती करण्यात आली आहे, असेही जोशी यांनी सांगितले.