Video : पुण्यात मेट्रोच्या बोगद्यात फडकला 'तिरंगा' ; सिव्हिल कोर्टपर्यंत काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:20 PM2020-09-28T18:20:12+5:302020-09-28T21:33:57+5:30
जमिनीखाली २८ मीटर खोलीवर बोगद्यात तिरंगा फडकावून कामाचा आनंद व्यक्त
पुणे: शिवाजीनगरपासून सुरू झालेला मेट्रो मार्गाचा बोगदा सोमवारी सिव्हिल कोर्टपर्यंत आला. आता आणखी काही दिवसांनी हा बोगदा मुठा नदीच्या खालून पुढे स्वारगेटपर्यंत जाईल. जमिनीखाली २८ मीटर खोलीवर बोगद्यात तिरंगा फडकावून कामाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
सिव्हिल कोर्ट इथे मेट्रोचे भूयारी स्थानक आहे. तिथून पुढे शिवाजीनगरकडे साध्या यंत्राने खोदकाम करण्यात येत होते. शिवाजीनगरपासून पुढे मात्र १०० फूट लांब टनेल बोअरिंग यंत्राने काम होत होते. हे दोन्ही बोगदे सोमवारी दुपारी जमिनीखाली एकत्र होऊन एकच सलग बोगदा तयार झाला.
सिव्हिल कोर्टच्या थोडे पुढच्या बाजूला रस्त्याच्या खाली २८ मीटर खोलीवर हे दोन्ही बोगदे एकत्र आले. टनेल बोअरिंग मशिनचे साडेसात मीटर व्यासाचे कटर बोगद्यातून पुढे आले. त्यावेळी राष्ट्रध्वज फडकावून जल्लोष झाला.
महामेट्रो चे संचालक (प्रकल्प) अतूल.गाडगीळ, रामनाथ सुब्रमण्यम, हेमंत सोनवणे, ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अभियंते तसेच कामगार यावेळी ऊपस्थित होते. रेंजहिल कॉर्नरपासून ऊतार सुरू होऊन शिवाजीनगरला बोगदा सूरू होतो. सिव्हिल कोर्टपर्यंत आता साधारण पावणेदोन.किलोमीटर अंतर झाले आहे. आता सिव्हिल कोर्टपासून पुढे काम सुरू होईल. मुठा नदीच्या खालून नदीतळाला धक्का न लावता हा बोगदा पूढे स्वारगेटपर्यंत जाणार आहे.