अमेरिका चाखणार भारतीय आंब्याची चव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:25 PM2022-07-04T13:25:29+5:302022-07-04T13:31:46+5:30
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदरावरून रवाना...
पुणे : महिनाभरापूर्वी मुंबई येथून कृषी पणन मंडळाच्या सुविधेवरून पाठविलेला भारतीय आंबा समुद्रमार्गे अमेरिकेच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. एकूण ५ हजार ५२० बाॅक्समधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरव्दारे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावाशेवा बंदरावरून रवाना करण्यात आला हाेता. तेथून हा कंटेनर अमेरिकेकडे (दि. ५ जून) रवाना झाला. ताे अमेरिकेत नेवार्क या न्यू जर्सी शहराजवळील बंदरात दि. २९ जून रोजी म्हणजे २५ दिवसांनी पोहोचला आहे.
अमेरिकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या १०० टक्के हवाईमार्गे होत आहे. यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे ५५० रुपये विमानभाडे द्यावे लागते. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने महाग पडताे. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा येतात. आंबा निर्यात समुद्रमार्गे सुरू झाल्यास अमेरिकेत आंब्याच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. वाहतूक खर्चात कपात होऊन ताे प्रति किलो १ डाॅलरपर्यंत येताे. यावर्षी भारतातून अमेरिकेला सुमारे ११०० मेट्रिक टन आंबा निर्यात झाली आहे.
अमेरिकेबरोबरच इतर देशांनाही समुद्रमार्गे निर्यात शक्य होणार आहे. अमेरिकेला समुद्रमार्गे निर्यातीसाठी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे अधिकारी, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार तसेच अमेरिकेच्या इन्स्पेक्टर डॉ. कॅथरीन फिडलर यांनी मार्गदर्शन केले. कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, अभिमन्यू माने, सुशील चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
इतर देशांच्या आंब्याशी स्पर्धा शक्य
भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर व कृषी पणन मंडळाच्या वतीने ही निर्यात करण्यात आली. हा आंबा दि. २९ मे ते २ जून दरम्यान पाच दिवस आंबा बागांमधून तोडणी करून कृषी पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आणण्यात आला. विकिरण सुविधा केंद्रात वाहतूक करून अमेरिकन इन्स्पेक्टरच्या मान्यतेनंतर आंब्यावर विकिरण प्रक्रिया केली. ताे शीतगृहात साठवला व पुढे पाठवला. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने स्पर्धात्मक ठरून इतर देशांच्या आंब्याशी स्पर्धा करू शकतो. आपल्याला अमेरिकेची बाजारपेठ जास्त कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकते.