India Post | एक रुपयाचा रेव्हेन्यू स्टँप पाच रुपयांना!
By नम्रता फडणीस | Published: July 12, 2022 09:42 AM2022-07-12T09:42:39+5:302022-07-12T09:49:24+5:30
रेव्हेन्यू स्टँपसाठी २ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत आहे...
पुणे : स्थळ : पोस्ट ऑफिस, टिळक रस्ता
ग्राहक : रेव्हेन्यू स्टँप आहे का?
कर्मचारी : नाही.
ग्राहक : कुठे मिळेल?
कर्मचारी : समोरच्या झेरॉक्सच्या दुकानात मिळेल.
पुढला प्रसंग-
ग्राहक : रेव्हेन्यू स्टँप आहे का?
दुकानदार : हो आहे.
ग्राहक : कितीला?
दुकानदार : दोन रुपये.
ग्राहक : पोस्टामध्ये १ रुपयाला मिळतो. मग तुमच्याकडे २ रुपये का?
दुकानदार (चिडून) : का म्हणजे? जा मग पोस्टातून घ्या.
ग्राहक : तिथे मिळत नाहीये म्हणून तर तुमच्याकडे आले.
दुकानदार : मग दोन रुपये का? असं कसं विचारता? लोक आमच्याकडे पाच रुपयाने घ्यायला पण तयार आहेत.
ग्राहक : स्टँपचा तुटवडा असताना तुम्हाला कसे मिळाले? तुम्ही कुठून आणले?
दुकानदार : आम्ही राजस्थानातून आणतो.
गेल्या काही दिवसांपासून शहरात रेव्हेन्यू स्टँपचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून, नागरिकांना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या रेव्हेन्यू स्टँपसाठी २ रुपयांपासून १० रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत आहे. शहरात ठिकठिकाणी पायपीट करण्यापेक्षा चढ्या दराने स्टँपची विक्री करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
रेव्हेन्यू स्टँप हा कायदेशीर व्यवहारांसाठीच्या वैधतेसाठीचा एक अत्यावश्यक घटक आहे. जसं की पैशाची पावती, एक्सचेंजचे बिल, चेक किंवा प्रॉमिसरी नोट, कर्जासाठीच्या जंगम मालमत्तेची पोचपावती, कर्ज किंवा मागणीची पोचपावती यांसह रोखीने भरलेले मासिक भाडे ५ हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर भाड्याच्या पावतीवर रेव्हेन्यू स्टँप चिकटवणे आवश्यक ठरते. तेव्हाच ती पावती वैध ठरली जाते. रेव्हेन्यू स्टॅम्प स्थानिक पोस्ट ऑफिसमधून खरेदी केले जाऊ शकतात.
एका रेव्हेन्यू स्टॅम्पसाठी १ रुपया शुल्क आकारले जाते; मात्र सध्या शहरात रेव्हेन्यू स्टँपचा तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने शहरात रेव्हेन्यू स्टँपच्या तुटवड्याबाबत स्टींग ऑपरेशन केले असता, पोस्ट ऑफिससह कोर्टातही रेव्हेन्यू स्टँप मिळत नसल्याचे चित्र आहे; मात्र खासगी दुकानदारांकडे रेव्हेन्यू स्टँप तत्काळ उपलब्ध होत असून, दोन रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत त्याची विक्री केली जात आहे. नागरिकांसाठी हे स्टँप आवश्यक असल्याने त्याच्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला देखील ते तयार होत असल्याने दुकानदारांचे चांगले फावत आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सुटला असल्याचे सांगितले आहे.