भारतीय रेल्वेचं 'पर्यावरणपूरक' मोठं पाऊल! ७३ हजार गाड्यांमध्ये बसवली अडीच लाखांपेक्षा अधिक जैव शौचालये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 03:25 PM2021-06-17T15:25:28+5:302021-06-17T15:29:23+5:30
आगामी काळात देशातील सर्वच रेल्वे गाड्यांत जैव शौचालये पाहायला मिळणार आहे.
पुणे : भारतीय रेल्वेनेपर्यावरणपूरक व मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आणि तितकेच मोठे पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत रेल्वे गाड्यांमध्ये आता जैव शौचालये बसविण्यात प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे देशभरातील आतापर्यंत ७३ हजार रेल्वे डब्यांमध्ये २ लाख ५८ हजार ९०६ जैव शौचालये बसविण्यात आली आहेत. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे थेट लोहमार्गावर मानवी मलमूत्र विसर्जित होऊन मानवी आरोग्य आणिपर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळता येेेणे शक्य होत आहे.
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेगाड्यांमध्ये जैव-शौचालयाची सुविधा बसविण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. याची अंमलबजावणी करताना भारतात आतापर्यंत एकूण ७३ हजार रेल्वे डब्यांमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त जैव-शौचालये बसविण्यात आली आहेत. यामुळे दिवसाला रेल्वेगाड्यांमधून लोहमार्गावर विसर्जित होणारे २ लाख ७४ हजार लिटर मानवी मलमूत्र रोखण्यात यश येत आहे.मध्य रेल्वेने यात पुढाकार घेत आपल्या सर्व डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली आहेत.
देशातील रेल्वेस्थानक आणि लोहमार्ग साध्या रचनेच्या शौचालयांमुळे नेहमीच चर्चेत होते. कारण मलमूत्र विसर्जन थेट लोहमार्गावर होत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत होती. तसेच यामुळे रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्यासोबतच पर्यावरणावर सुद्धा दुष्परिणाम होत होता. भारतीय रेल्वेने या समस्यांवर पर्याय म्हणून रेल्वेच्या डब्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. प्रत्येक विभागाला आपापल्या गाड्यांमध्ये जैव-शौचालय बसविण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे लक्ष देण्यात आले होते. मध्य रेल्वेने आपल्या सर्व गाडय़ांमधील पाच हजार डब्यांमध्ये जैव-शौचालये बसविली आहे.
कशी होते प्रक्रिया ?
भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये ही जैव-शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात रेल्वे डब्यांमध्ये शौचालयाच्या खालील भागात एका मोठ्या रचनेच्या टाकी बसविली आहे. त्या टाकीत जीवाणूंची पैदास करत मानवी मैल्याचे त्यांच्यामार्फत पाण्यामध्ये रूपांतर केले जाते. तसेच क्लोरिनच्या सहाय्य्याने ते पाणी स्वच्छ केले जाते. अशाप्रकारे लोहमार्गावर केवळ प्रदूषणमुक्त पाणीच बाहेर टाकले जाते. यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत आहे.तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा कोणते दुष्परिणाम होत नाही.सध्या फक्त वापरात असणाऱ्या गाड्यांमध्ये ही शौचालये बसविण्यात आली आहेत. नव्याने निर्मिती होत असलेल्या रेल्वेच्या डब्यांमध्ये आता जैव-शौचालयेच बसविण्यात येत आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातील सर्वच रेल्वे गाड्यांत जैव शौचालये पाहायला मिळणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.