लोहगावात आढळला इंडियन रॉक पायथन अजगर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 03:03 PM2018-08-28T15:03:59+5:302018-08-28T15:12:40+5:30
लोहगाव येथील गोठणवढा भागात सोमवारी रात्री इंडियन रॉक पायथन जातीचा मोठा अजगर आढळून आला.
लोहगाव: लोहगाव येथील गोठणवढा भागात सोमवारी रात्री इंडियन रॉक पायथन जातीचा मोठा अजगर आढळून आला. याठिकाणी ओढ्याच्या शेजारी कामगारांचा कॅम्प लागला होता. त्यावेळी तेथील रहिवासी असलेले अतुल खांदवे,मयुर खांदवे यांच्या निदर्शनास हा अजगर आला. त्यांनी तत्काळ सर्पमित्र अजय कोंढावळे व शुभम अधिकारी, यांच्यासह सारंग देवकर यांना रात्री सव्वा बाराच्या सुमारास फोन केला. या सर्पमित्रांनी अजगराला काळजीपूर्वक पकडले. कोंढावळे यांनी या अजगराविषयी माहिती देताना सांगितले, हा इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर आहे. त्याचे वजन साधारण १४ किलो तर लांबी ८ ते ९ फूट होती. हा अजगर दुर्मिळ असून डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतो. पण सोमवारी रात्री नागरी वस्तीच्या जवळ अजगर दिसल्याने आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा व कुतुहलाचा विषय ठरला.अजगर वनविभागाचे विष्णू गायकवाड, हवालदार शितल फुंदे ,वनरक्षक दया डोमो यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी लक्ष्मण टिंगरे यांच्या समक्ष सर्पमित्र सारंग देवकर,धनंजय जाधव,श्रीधर गायकवाड,गजानन टिंगरे,निलेश खांदवे,सचिन मासुळकर यांनी हा अजगर वनविभागाच्या हद्दीमध्ये सोडला.