भारतीय म्हणजेच आपण सर्व हिंदू आहोत : अनिरुध्द देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 01:18 PM2019-07-25T13:18:36+5:302019-07-25T13:20:12+5:30
पुणे : भारतीय हा भूगोलवादी तर हिंदू हा समाजवादी शब्द आहे. भारताची पूर्वापार चालत असलेली संस्कृती हिंदू संस्कृती आहे. ...
पुणे : भारतीय हा भूगोलवादी तर हिंदू हा समाजवादी शब्द आहे. भारताची पूर्वापार चालत असलेली संस्कृती हिंदू संस्कृती आहे. भारतीय म्हणजेच आपण सर्व हिंदू आहोत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्कप्रमुख अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग यांच्या वतीने पी. परमेश्वरन लिखित ‘हिंदू राष्ट्रांची हृदयस्पंदने’ या खंडांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते खंडांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अनुवादक ज्येष्ठ पत्रकार दत्ता पंचवाघ, अरुण करमरकर, भगवान दातार, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, किरण कीर्तने आदी उपस्थित होते. विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. परमेश्वरन यांच्या गेल्या ५० वर्षांतील साहित्याचा संपादित ग्रंथसंग्रह इंग्रजी भाषेत ‘हार्ट बिट्स आॅफ हिंदू नेशन’ या नावाने गेल्या वर्षीच प्रसिद्ध झाला. या ग्रंथसंग्रहांचा मराठी अनुवाद ३ खंडांमध्ये प्रसिद्ध झाला.
देशपांडे म्हणाले, समाज संस्कृती उत्पन्न करतो. त्यामुळे ही समाजस्वीकृत गोष्ट आहे. संस्कृती ही अधिक काळ टिकून राहते. काळानुसार मानवी चिंतनात बदल होत असतात. संस्कृतीत बदल होत नाहीत. हिंदू हा विस्तारवादी धर्म आहे. पण हिंदूच्या संस्कृतीला हीन दिन करून टाकावे, असे पाश्चात्य लोकांचे विचार होते. परंतु भारतीय संस्कृतीत सुप्त ताकद असल्याने ती अजूनही टिकून आहे. हे तिन्ही ग्रंथ आपल्याला मिळालेले लाभदायक चिन्ह आहे. यातून आपल्याला पी. परमेश्वरन यांचा कर्तृत्व, लिखाण, सामाजिक कार्य असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो.
मला एका खंडाच्या अनुवादाची संधी मिळाली. त्यामध्ये हिंदू संस्कृतीच्या विविध संकल्पनांचे प्रदर्शन केले आहे. श्रद्धा ही फक्त हिंदूंमध्ये असते. हे पुस्तकातून दिसून येते. कार्ल मार्क्स आणि विवेकानंद अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे. दोघांच्या विचारांचा केंद्रबिंदू माणूसच आहे, असे दातार यांनी नमूद केले.
..........
हिंदू राष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा
हिंदू राष्ट्र संकल्पनेच्या विविधतेची सखोल चिकित्सा ग्रंथातून मांडली आहे. त्याचा अनुवाद करणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते. ग्रंथांचा अनुवाद करताना आमच्या ज्ञान कक्षेला वाव मिळाला आहे. सर्वांनी हे ग्रंथ वाचून हिंदू राष्ट्राची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असे अरुण करमरकर यांनी यावेळी सांगितले.