देशात २० हजार कोटींची उसाची एफआरपी थकीत; इस्माची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:22 AM2019-02-05T05:22:42+5:302019-02-05T05:23:06+5:30
देशात जानेवारीअखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे.
- विशाल शिर्के
पुणे - देशात जानेवारीअखेरीस ५१४ साखर कारखान्यांमधून १८५.१९ लाख टन साखर उत्पादित झाली असून, गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टन साखरेचे अधिक उत्पादन झाले आहे. उसाची एफआरपीची देशपातळीवर तब्बल २० हजार कोटी रुपयांची रक्कम जानेवारी अखेरीस थकीत असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यांतही साखर उत्पादन वाढले आहे.
ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटींची थकबाकी होती. शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारी रोजी साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्तालयाने ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट बजावले. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरू असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आंदोलनानंतर कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
राज्यात १९१ कारखान्यांमधून १ फेब्रुवारीअखेरीस ६६१.१८ लाख टन ऊस गाळपातून, ७१ लाख टन साखर उत्पादित झाली. उत्तर प्रदेशात ११७ साखर कारखान्यांमधून ५३.३६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी या काळात ११,९५३.९८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या सरासरी उताºयात ०.८१ टक्के वाढ झाल्याने उत्तर प्रदेशने गेल्या वर्षीची उत्पन्नाची सरासरी गाठली आहे.
३५०० ते ३६०० रुपये दर हवा
सध्या साखरेची किमान आधारभूत किंमत २९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. कारखान्यांमध्ये सध्या २९ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने साखरेची विक्री सुरू आहे. साखरेच्या उत्पादन खर्चापेक्षा हा दर पाच ते सहा रुपये प्रतिकिलोने कमी आहे. त्यामुळे साखरेची किमान आधारभूत किंमत ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटल (३५ ते ३६ रुपये किलो ) केली पाहिजे. तरच, शेतकºयांची उसाची देणी कारखान्यांना देता येतील, असे इस्माचे म्हणणे आहे.