सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:06 PM2023-01-28T19:06:47+5:302023-01-28T19:09:16+5:30

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक....

India's assertiveness reached the world due to clear foreign policy - Devendra Fadnavis | सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली- देवेंद्र फडणवीस

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली- देवेंद्र फडणवीस

Next

पुणे : भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ.गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे. 

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश
जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ.जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक
उपमुख्यमंत्री म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे. 

Web Title: India's assertiveness reached the world due to clear foreign policy - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.