Sinhagad Fort: भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा; लागोपाठ १६ वेळा सर करावा लागणार सिंहगड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 09:57 AM2024-12-11T09:57:50+5:302024-12-11T09:58:50+5:30
एव्हरेस्टिंग स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर सिंहगड चढून सर करायची, त्यामुळे १६ वेळा सिंहगड सर करावा लागणार
पुणे : किल्ले सिंहगडावर भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा १३ ते १५ डिसेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर सिंहगड चढून सर करायची आहे. त्यामुळे स्पर्धकांना १६ वेळा सिंहगड सर करावा लागेल, अशी माहिती पर्यटन विभागाच्या उपसंचालक शमा पवार यांनी दिली.
यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक पवार, आशिष कासोदेकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन विभाग व सिंपल फिटनेस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम प्रथमच होत आहे. सिंहगडावर दोन विभागात ही स्पर्धा होईल. त्यामध्ये सोळा वेळा गड सर करणे आणि दुसरा गट अर्थ वेळा म्हणजे आठ वेळा सर करावयाचा आहे. स्पर्धक गटाने किंवा स्वतंत्र सहभागी होऊ शकतात. नवोदितांसाठी यामध्ये फन रन / वॉक हा पर्यायदेखील उपलब्ध आहे. या पर्यायात स्पर्धक पौर्णिमेच्या रात्री म्हणजे १४ डिसेंबरला एकदा सिंहगड सर करतील. स्पर्धक घाट रस्त्याने सिंहगड सर करतील. त्यामुळे स्पर्धेच्या कालावधीत सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने अपवाद असतील.