Sugar Museum | भारतातील पहिले साखर संग्रहालय होणार पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:18 PM2022-06-01T17:18:38+5:302022-06-01T17:24:49+5:30

संग्रहालयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध...

indias first Sugar Museum will be in pune in 5 acre near sugar commissioner office | Sugar Museum | भारतातील पहिले साखर संग्रहालय होणार पुण्यात

Sugar Museum | भारतातील पहिले साखर संग्रहालय होणार पुण्यात

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे: भारतातील पहिल्याच साखर संग्रहालयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. भारतातील हे पहिलेच साखर संग्रहालय आहे. ५ एकरांच्या जागेत साखर आयुक्त कार्यालयाजवळ हे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. साखरेशी संबंधित वेदकाळापासूनच्या गोष्टी व साखर कारखान्याची प्रत्यक्ष प्रतिकृती, साखर या विषयावरच्या जगभरातील पुस्तकांचे संदर्भ ग्रंथालय हे या चारमजली साखर संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, राज्य सरकारने संग्रहालयाच्या कामासाठी म्हणून सध्या ४० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. त्याचा संकल्पीत आराखडा तयार आहे. त्यात काय असेल, काय असायला हवे, याचे संपूर्ण पेपर वर्क तयार करण्यात आले आहे. आता प्रसिद्ध झालेली निविदा त्या ५ एकरांच्या जागेत संग्रहालय कसे असेल, याचे डिझाइन सादर करण्याची आहे. १७ जूनपर्यंत निविदेची मुदत असून, अशा प्रकारचे काम करणाऱ्या देश-परदेशातील कंपन्यांकडून निविदांना प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

संग्रहालयाच्या उभारणीसाठी सरकारने एक समिती स्थापन केली असून, त्या समितीच्या कार्यकारी मंडळाचे आयुक्त गायकवाड प्रमुख आहेत. ते म्हणाले, अशा प्रकारच्या संग्रहालयाची कल्पना सरकारकडे प्रस्तावित केल्यानंतर त्यासाठी लगेच मंजुरी मिळाली. भारतात कुठेही असे संग्रहालय नाही. साखर आयुक्त कार्यालय पुण्यात असल्यामुळे ते पुण्यातचे करणे योग्य होते. संग्रहालय पूर्ण होईल, त्यावेळी त्याच्या रूपाने पुणे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

Web Title: indias first Sugar Museum will be in pune in 5 acre near sugar commissioner office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.