पुण्यात होतंय देशातील दुसरे ‘थ्रीडी प्रिंटिंग’ टपाल कार्यालय; मशीन व रोबोटचा वापर, तंत्रज्ञानाद्वारे उभारणार इमारत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 03:50 PM2024-10-14T15:50:09+5:302024-10-14T15:50:58+5:30
बांधकामासाठी ‘थ्रीडी प्रिंटर’ची मोठी उपकरणे वापरली जात असून थ्रीडी प्रिंटिंगमध्ये भिंती, मजले आणि छप्पर तयार करताना थरावर थर उभारले जातात
पुणे : शहरातील सहकारनगर येथे टपाल विभागाचे कार्यालय ‘थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञाना’द्वारे तयार केले जाणार आहे. या इमारतीसाठी मशीन व रोबोटचा वापर होईल, त्यात कोणतेही व्हर्टिकल पिलर नसतील. या कार्यालयासाठी मंजुरी मिळाली असून, येत्या वर्षात हे कार्यालय सुरू होईल, अशी माहिती पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवर अधीक्षक रिप्पन ड्यूलेट यांनी दिली.
देशामध्ये पहिल्यांदाच बंगळुरूतील हलसुरू बाजाराजवळ ‘केंब्रिज लेआउट’ येथे त्रिमितीय मुद्रण (थ्री-डी प्रिंटिंग) तंत्रज्ञानातून भारतातील पहिले टपाल कार्यालय साकारले आहे. त्यानंतर दुसरे कार्यालय पुण्यातील सहकारनगरमध्ये उभारले जाईल. रोबोटिक प्रिंटरच्या मदतीने काँक्रीटचे थर रचले जातात. एक मोठा रोबोटिक प्रिंटरद्वारे हे सर्व काम होते, त्यासाठी कामगार लागत नाहीत. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी, मद्रास) त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. बंगळुरातील कार्यालय हे २६ लाखांमध्ये तयार झाले. पारंपरिक बांधकामाच्या तुलनेने ३० ते ४० टक्के कमी खर्च झाला. पारंपरिक पद्धतीने एक हजार चौरस फुटांचे घर बांधायला एक वर्ष जाते. बंगळुरू येथील कार्यालय अवघ्या ४४ दिवसांत पूर्ण झाले. बंगळुरूच्या कार्यालयास ‘केंब्रिज लेआउट टपाल कार्यालय’ असे नाव आहे.
थ्रीडी प्रिंटिंग म्हणजे काय?
थ्रीडी ‘प्रिंटर’म्हणजे आपण जे प्रिंट करतो, त्यापेक्षा वेगळे तंत्रज्ञान आहे. बांधकामासाठी ‘थ्रीडी प्रिंटर’ची मोठी उपकरणे वापरतात. थ्रीडी प्रिंटिंगमध्ये भिंती, मजले आणि छप्पर तयार करताना थरावर थर उभारले जातात, त्यासाठी रोबोटिक्सचा वापर होतो. नेहमीप्रमाणे विटा रचून त्यावर थर देण्याच्या प्रक्रियेपेक्षा ही पद्धत वेगाने होते. या तंत्रज्ञानाने एक हजार चौरस फुटांचे घर पाच ते सात दिवसांत साकारले जाते.
कसे चालते काम?
थ्रीडी प्रिंटिंग करण्यासाठी अगोदर संगणकावर आराखडा करावा लागतो. अभियंत्यांद्वारे संगणकावर ‘थ्रीडी प्रिंटर’ सर्व रचना प्रत्यक्ष साकारतो. या रचनेचा मितीय तपशील, भिंत ‘लोड-बेअरिंग’ किंवा वजन पेलण्यास सक्षम आहे किंवा नाही आणि तिच्या अपेक्षित रुंदीचे सर्व तपशील या ‘प्रिंटर’कडे उपलब्ध असतात. त्यानुसार बांधकामाचे स्तर उभारतात. काँक्रिट मिश्रण हे कोरड्या घटकांनी होते आणि वेगाने होते. सर्व प्रक्रिया ‘थ्रीडी काँक्रिट प्रिंटर’ करतो. या ‘प्रिंटर’द्वारे भिंत, खांब, छत साकारले जातात. त्यानंतर दारे-खिडक्या, वीजयंत्रणा, नळयोजना होते.
केवळ इमारत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे होईल. त्यातील कामे मात्र नेहमीप्रमाणे होतील. इमारत बांधण्याचे काम या तंत्रज्ञानातून लवकर होणार असून, देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारे साकारलेले पहिलेच टपाल कार्यालय असेल. - रिप्पन ड्यूलेट, पुणे शहर (पश्चिम) टपाल विभाग, लोकमान्यनगर