नद्यांमधील देशी प्रजातीचे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 12:23 PM2022-07-14T12:23:22+5:302022-07-14T12:24:45+5:30
अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत, तर काही प्रजाती नष्ट झाल्या...
- जयवंत गंधाले
हडपसर : जिल्ह्यातील मुळा-मुठा व भीमा नदीतील देशी माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, या प्रजातींचे संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत निसर्गयात्री संस्थेचे सदस्य दत्तात्रेय लांघी यांनी व्यक्त केले. मुळा-मुठा व भीमा नदीमध्ये तब्बल ३० प्रजातींच्या माशांचे अस्तित्व आढळून येत होते. यातील अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत, तर काही प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
पाण्याचे प्रदूषण, कोरडे नदीपात्र, नदीपात्रात जलपर्णींचे आक्रमण व वाळू उपसा यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत, असेही लांघी यांनी सांगितले. मुळा-मुठा नदीला तर वर्षाकाठी पाच ते सहा महिने जलपर्णीचा वेढा पडलेला असतो. या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलजीवांवर याचा परिणाम होतो.
मुळा-मुठा व भीमा नदीतील कोळशी, घोगरा, वर डोळी, अहिर, कुत्तरमासा, बोबरी, फेक, डबरी, वाघ्यामासा, आळकुट, वारडी गोलटा, पाणगट, चांभारी, लोळी व मुऱ्हा या १५ माशांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत, तर चालट, आंबळी, कानुशी, गुगळी, खडशी, शिंगटा व शिंगाडा या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या भीमा, मुळा-मुठा व उजनी धरण क्षेत्रात मूळ माशांचा शत्रू असणाऱ्या चिलापी माशाचे प्रमाण जास्त आहे. घाण पाण्यात राहण्याबरोबर इतर माशांच्या अंड्यांना हानी पोहोचवण्याचे काम या माशाकडून होते. परिणामी इतर प्रजातींसाठी याचे वास्तव्य घातक ठरत आहे. बहुतांश नद्या व धरणामध्ये चिलापीची घुसखोरी झालेली आहे. पंधरा वर्षांपूर्वी येथे तीस प्रकारच्या जातींचे मासे मोठ्या प्रमाणात मिळायचे. चिलापी हा मासा आफ्रिकेतील असून, मूळ नाव तिलापिया मोंझाबिकस आहे. त्याचा अपभ्रंश होऊन तो चिलापी म्हणून ओळखला जाऊ लागला.
पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटले...
देशी माशांच्या प्रजाती नष्ट झाल्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. पाण्यात अनेक प्रकारचे कृमी जीव तयार होऊन पाणी दूषित होण्याबरोबरच विविध वनस्पतींचा नाश होत आहे. शिवाय शैवालजातीच्या वनस्पतीचे प्रमाण वाढून, पाण्यातील बुरशीजन्य जीव मोठ्या प्रमाणात तयार होतात. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटण्याबरोबर या माशांवर अवलंबून पक्ष्यांची अन्नाची भटकंती वाढली आहे. शिवाय पाटबंधारे विभाग देशी माशांचे बीज सोडण्यास उदासीन असल्याने या माशांच्या प्रजातींचा ऱ्हास होऊ लागला आहे.