तहसिलदारांसाठी तालुका एकवटला, बदली रद्दसाठी इंदापूरला लाक्षणिक उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:03 PM2018-08-25T23:03:02+5:302018-08-25T23:03:43+5:30
‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी
इंदापूर : इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची बदली अधिनियम कायद्याचे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने केल्याने नागरिकांमधून निषेध नोंदविण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील विविध संघटनांच्या वतीने शनिवारी (दि. २५) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने या वेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांसाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ या कायद्याचे कलम ३ नुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी अ, ब आणि क गटांतील राज्य शासनाचे सर्व सेवक किंवा कर्मचारी यांच्यासाठी एखाद्या पदावर काम करण्याचा सामान्य कालावधी हा ३ वर्षांचा
आहे. असे असताना इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या बदलीची कारणे कोणती व कोणत्या कायद्याने शासनाने बदली केली, असा सवाल नागरिक विचारत आहेत. यावेळी इंदापूर सजग नागरिक, बहुजन मुक्ती पार्टी, विचार मंथन परिवार, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया युवक आघाडी, बहुजन क्रांती मोर्चा, मातंग समाज एकता आंदोलन, अखिल भारतीय मराठा मोर्चा, शेतकरी संघटना, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटना, अनेक विद्यार्थी संघटना यांनी पाटील यांची बदली रोखण्यासाठी शासनाला वेगवेगळी निवेदने दिली.
शनिवार (दि. २५) रोजी सकाळी १० ते ५ पर्यंत तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, विविध संस्थांचे कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी यांनी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सर्व संघटनांनी निवेदनामध्ये इशारा दिला आहे की, या उपोषणानंतर शासनाने बदली रद्द न केल्यास सविनय मार्गाने सत्याग्रह करणार आहे. यावेळी जनार्दन पांढरमिसे, बाबासाहेब भोंग, अनिल खोत, भजनदास पवार, प्रवीण पवार, अमर बोराटे, तानाजी मारकड, विचार मंथन परिवाराचे अॅड. विशाल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, प्रकाश पवार, नितीन आरडे, उजेर शेख, धनाजी सुर्वे, राजेंद्र हजारे, बाळासाहेब सरोदे, सूरज वनसाळे, कालिदास देवकर, गुलाबराव फलफले, हनुमंत कदम, अॅड. तुषार झेंडे, सुनिल गलांडे, रत्नाकर मखरे, लक्ष्मण देवकाते आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकाल पूर्ण नसताना बदली कशी?
इंदापूरचे तहसीलदार यांनी मागील २ वर्षांत त्यांच्या पदाला न्याय दिला असून, सर्वसामान्य गरीब, शेतकरी यांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी कामे करून, वंचितांना केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. तहसील कार्यालयामध्ये पारदर्शकता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व गतिमान व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, तालुक्याच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावून प्रशासनाची मान उंचावली; मात्र तरीही त्यांच्या पदाचा ३ वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत नसतानादेखील बदली कशी करण्यात येत आहे,असा सवाल नागरिक करत आहेत.
पोलीस पाटील संघटनेचे निवेदन
बदली तातडीने रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस पाटील संघटनेच्यावतीने भिगवण पोलिसांना देण्यात आले आहे, तर बदली रद्द करण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडूनही बदली रद्द न झाल्यास तालुक्यातील अनेक गावांतून रास्तारोको केला जाणार असल्याची माहिती पोलीस पाटील संघटनेनी दिली. यावेळी राजेंद्र तांबिले, अशोक घोगरे, संजय कांबळे उपस्थित होते.
८०च्या वर गावांची सह्यांची मोहीम
तालुक्यातील ८०च्या वर गावांनी सह्यांची मोहीम राबवीत बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. तरुणांनीदेखील सोशल मीडियातून तहसीलदार यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ग्रुपवर तहसीलदार यांच्या बाजूने विचार मांडण्याचे प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.
जनसामान्य नागरिकांच्या अडचणी समाधानकारक सोडवण्याचे काम श्रीकांत पाटील करत होते, प्रशासनात झीरो पेंडन्सी काम करून आदर्श निर्माण करणारा एक प्रामाणिक अधिकारी इंदापूरमधून जाणे म्हणजे जनसामान्य लोकांचे नुकसानच आहे. शासनाने त्यांची त्वरित बदली रद्द करून जनसामान्य लोकांना शासनानेच न्याय द्यावा हीच मागणी आहे.
- पृथ्वीराज जाचक,
राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष