Pune Crime: चाकण परिसरात बेधुंद फायरिंग; रासे फाट्यावरील 'हॉटेल मराठा'मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 02:18 PM2024-03-19T14:18:57+5:302024-03-19T14:19:25+5:30
ही घटना खेड तालुक्यातील रासे फाटा येथील हॉटेल मराठा येथे घडली आहे....
चाकण (पुणे) : खुनातील आरोपींना मदत केल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने (दि.१८ ) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सराईत गुन्हेगारावर बेधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना खेड तालुक्यातील रासे फाटा येथील हॉटेल मराठा येथे घडली आहे.
स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे (रा.रासे,ता.खेड,जि. पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल पवार (रा.महाळुंगे,ता खेड); अजय गायकवाड (रा.महाळुंगे,ता खेड ) आणि दोन अनोळखी इसमांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, यातील अजय गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण - शिक्रापूर मार्गावरील रासे फाटा ( ता.खेड ) येथील मराठा हॉटेल येथे स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे यांचेवर पिस्तुलमधून फायरिंग करण्यात आल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. घटनास्थळी जात पोलिसांनी माहिती घेतली असता, फिर्यादी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर फायर झाले होते. राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार (रा. महाळुंगे ) याचा चार महिन्यापूर्वी खून झाला होता. त्या खुनातील आरोपींना सोप्या शिंदे ह्याने मदत केली असून त्यांना सहकार्य केले असल्याची माहितीवरून आरोपींनी सोप्या शिंदेवर दोन फायर केली. त्यामुळे त्याच्या डोक्यास किरकोळ जखम झाली आहे. घटनेनंतर एकास अटक करण्यात आली असून इतर फरारी आरोपींच्या शोधासाठी चाकण पोलिसांच्या टीम रवाना करण्यात आल्या आहेत.