इंदोरीकर महाराजांची शैली कीर्तन परंपरेला बाधा आणणारी ; सदानंद मोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 08:46 PM2020-02-19T20:46:30+5:302020-02-19T20:55:16+5:30
इंदोरीकर महाराज त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले असून त्यांचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. त्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेतल्याने सोशल मीडियावर याच विषयाची चर्चा आहे.
पुणे : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहेत. मात्र त्याबद्दल माझा कोणताही आक्षेप नसून त्यांच्या शैलीमुळे मूळ कीर्तन परंपरेला बाधा येत असल्याचेपरखड मत संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे.
इंदोरीकर महाराज त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले असून त्यांचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट आमनेसामने आले आहेत. त्यातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी या वादात उडी घेतल्याने सोशल मीडियावर याच विषयाची चर्चा आहे. या प्रकरणावर पडदा पडावा म्हणून महाराजांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.आता मात्र ज्या कीर्तनाच्या शैलीमुळे महाराज प्रसिद्ध झाले, टिक टॉकवर गाजले त्या शैलीबद्दल मोरे यांनी विचार मांडले आहेत.
याबाबत लोकमतशी बोलताना मोरे म्हणाले की, 'माझे त्यांच्याशी व्यक्तिशः कोणतेही वैर नाही. परंतू, ते ज्या पद्धतीने कीर्तन करतात ती पद्धत वारकरी संप्रदायात बसत नाही. अगदी रससिध्दांताच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास, कीर्तनात शांत रस व भक्ती रस यांचा संगम होणे अपेक्षित आहे.तो कीर्तनाचा स्थायी रस आहे. त्या अनुषंगाने एखादा चुटकुला येऊन गेला तर हरकत नसते. परंतु जेव्हा विनोद किंवा हास्य रस भक्ती आणि शांत रसावर कुरघोडी करतो तेव्हा काळजी करण्याची वेळ येते. आपल्याकडे वीर रसासाठी पोवाडा आहे, शृंगारासाठी लावणी आहे तसाच हास्य रस कीर्तनात मुख्य होणे चुकीचे आहे. संत नामदेवांनी सुरु केलेल्या मूळ कीर्तन परंपरेला बाधा येत आहे. विनोदमूर्ती, विनोदवीर असे विशेषण कीर्तनकाराच्या मागे लागणे संप्रदायाच्या दृष्टीने काळजीचे आहे. त्यांना प्रतिसाद मिळाला ते वाहवत गेले, त्यात त्यांचा दोष आहे असेही नाही. मात्र नवीन कीर्तनकार त्यांची नक्कल करतात, ती शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात याकडेही बघायला हवे. कीर्तनाला कीर्तन राहू द्या. त्याची लावणी, पोवाडा, चुटकुला किंवा स्टॅन्ड अप कॉमेडी करू नका असे मला वाटते.