इंदापूरला २६९ कोटींचा निधी मंजूर
By admin | Published: March 1, 2016 01:17 AM2016-03-01T01:17:13+5:302016-03-01T01:17:13+5:30
महाराष्ट्र राज्य महापारेषण व वीज वितरण कंपनीच्या कामासाठी इंदापूर तालुक्याकरिता २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर : महाराष्ट्र राज्य महापारेषण व वीज वितरण कंपनीच्या कामासाठी इंदापूर तालुक्याकरिता २६९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्य वीज मंडळाचे सदस्य प्रवीण शिंदे, बारामती विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल घोलप यांच्यासमवेत झालेल्या महापारेषण व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, की दीनदयाळ उपाध्याय योजना डीपीसीआयपीएल योजनांतर्गत, शेळगाव, लासुर्णे, लोणी देवकर, बाभूळगाव, पिंपरी, टण्णू याठिकाणी ३३ के. व्ही क्षमतेच्या सबस्टेशनसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत, लवकरच सबस्टेशनचे उद्घाटन होणार आहे. या कामासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही कामे त्वरित पूर्ण झाली आहेत. तसेच, बिजवडी, रेडणी, अगोती नं. १, इंदापूर, काळेवाडी, भाटनिमगाव येथील सबस्टेशनमध्ये अतिरिक्त रोहित्र बसविण्यात येणार आहे. यामुळे या भागातील शेतपंपाना व कारखान्याना पुरेसा वीजपुरवठा होणार आहे. वीज खंडित होणार नाही, असे सांगून भरणे पुढे म्हणाले, की इंदापूर शहरात भूमिगत वीजलाईन टाकण्यासाठी ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम एक वर्षात पूर्ण करण्याचा महामंडळाचा संकल्प आहे. त्यामुळे इंदापूर शहरात सुटसुटीतपणा येणार आहे. ज्या ठिकाणी उंच इमारती उभ्या आहेत. त्याठिकाणी वीज प्रवाहक तारांचा होणारा त्रास बंद होणार आहे. वीजप्रवाह तारांना चिटकून होणारे अपघात यापुढे बंद होतील, असे भरणे यांनी स्पष्ट केले. वालचंदनगर येथे नवीन २२० के. व्ही क्षमतेच्या सबस्टेशनसाठी ११९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे.