प्रदूषणामुळे इंद्रायणीचे पावित्र्य हरपले
By admin | Published: April 28, 2017 05:41 AM2017-04-28T05:41:51+5:302017-04-28T05:41:51+5:30
भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने
शेलपिंपळगाव : भारतीय संस्कृतीत मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात येऊ लागले आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या प्रदूषणात कमालीची वाढ होत आहे. आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. महिन्यापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच नदी स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत. इंद्रायणीला पूर्वीचे निर्मळ वैभव कधी प्राप्त होणार? असा सवाल भाविकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
सध्या आळंदीतील पवित्र इंद्रायणी पात्रात पाण्याचा अतिशय अल्प साठा आहे. त्यामुळे नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे ठणठणीत पडले आहे. परंतु पात्रात शिल्लक असलेल्या पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींमधील रसायनमिश्रित घाण पाणी इंद्रायणीच्या प्रवाह पात्रात सोडले जात असल्याने पाण्याचा निळा रंग बदलून पाण्याला काळा कुळकुळीत रंग आलेला आहे. त्यातच इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जात असून, बिनधास्तपणे सांडपाणी सोडले जात असल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. परिणामी पाण्याचा दुर्गंधीयुक्त घाण वास येऊ लागला आहे. आळंदी हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे समाधिस्थळ असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी अलंकापुरीत माउलींच्या दर्शनासाठी येत असते. परंतु वाहतूककोंडी, खड्डेमय रस्ते, घनकचरा, दुर्गंधी अतिक्रमण आदी विविध समस्यांमुळे ‘देवाच्या दारी समस्या भारी’ असाच प्रत्यय सध्या भाविकांना अनुभवयास मिळत आहे. अस्ताव्यस्त पडलेला केरकचरा, काचा, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खरकटे अन्न आदी गोष्टींमुळे नदी प्रदूषित झाली आहे.