'इंद्राणी बालन फाउंडेशन' काश्मीरमधील आणखी काही शाळा दत्तक घेणार- पुनीत बालन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:25 AM2023-11-06T11:25:19+5:302023-11-06T11:31:51+5:30

यावेळी काश्मीर खोऱ्यात आणखी शाळा दत्तक घेण्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योगपती पुनीत बालन यांनी केली....

'Indrani Balan Foundation' will adopt some more schools in Kashmir | 'इंद्राणी बालन फाउंडेशन' काश्मीरमधील आणखी काही शाळा दत्तक घेणार- पुनीत बालन

'इंद्राणी बालन फाउंडेशन' काश्मीरमधील आणखी काही शाळा दत्तक घेणार- पुनीत बालन

पुणे : काश्मीरमधील बारामुल्ला भागात 'इंद्राणी बालन फाउंडेशन' आणि 'चिनार कॉप्स' यांच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या विशेष मुलांच्या 'डेंगर परिवार स्कूल'चा दुसरा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी काश्मीर खोऱ्यात आणखी शाळा दत्तक घेण्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योगपती पुनीत बालन यांनी केली.

दहशतीच्या छायेत वाढणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात -इंद्राणी बालन फाउंडेशन' आणि 'चिनार कॉर्प्स' यांच्या वतीने ऑक्टोबर २०२१ पासून डेंगर परिवाराच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत सद्य:स्थितीला १०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचा दुसरा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, 'आरएमडी फाउंडेशन'च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन, १९ इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल राजेश सेठी यांच्यासह लष्कराचे अनेक अधिकारी या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या विशेष विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी जान्हवी धारीवाल- बालन म्हणाल्या, "काश्मीरमध्ये फाउंडेशनने लष्कराच्या सहकार्याने ११ शाळा सुरू केल्या आहेत, त्यापैकी असलेली ही विशेष मुलांची शाळा आहे. या मुलांमध्ये सामान्य मुलांपेक्षा अधिक क्षमता आहेत, अशा मुलांना अनेक योग्य संधी उपलब्ध करून देणे हा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून ते अधिक प्रगती करू शकतील."

मेजर जनरल राजेश सेठी म्हणाले की, 'इंद्राणी बालन फाउंडेशनच्या सहकार्याने लष्कर निश्चितपणे शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करेल. ज्यामुळे जास्तीतजास्त मुलांना येथील संधी उपलब्ध होऊ शकतील आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकेल.' या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी भारतीय लष्कर आणि फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या शाळांमधून काश्मीरची नवीन पिढी घडत आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच टॅलेंट आहे. त्यामुळे दहशतीच्या छायेत वाढणाच्या या विद्यार्थ्यांमधून भविष्यात आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारे हिरे तयार होतील, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे पुढील काळात नव्याने आणखी काही शाळा आम्ही सुरु करण्याचे आमचे नियोजन आहे.

- पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाउंडेशन.

 

Web Title: 'Indrani Balan Foundation' will adopt some more schools in Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.