डिटर्जंटच्या प्रदूषणामुळे इंद्रायणी फेसाळली, प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्राथमिक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:54 PM2024-01-12T12:54:26+5:302024-01-12T12:55:01+5:30
इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे....
- विश्वास मोरे
पिंपरी : गेल्या दहा दिवसांपासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा दिवस पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नदी फेसाळण्याचे कारण डिटर्जंट असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. दूषित पाणी नद्यांमध्ये जाणार नाही, याची दक्षता महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसीने घ्यावी, अशा सूचनाही मंडळाने केल्या आहे.
इंद्रायणी नदीच्या उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी थेट सोडले जात आहे. २ जानेवारीपासून नदी फेसाळत आहे. मात्र, आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना प्रदूषणाचे ठोस कारण सापडले नव्हते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळास ते सापडले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतची निरीक्षणे
१) नदीवर चिंबळी आणि आळंदी येथे दोन बंधारे आहेत. चिंबळीच्या बंधाऱ्यातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा बंधारा ओव्हरफ्लो झाला की, आळंदीचा बंधारा ओव्हरफ्लो होतो. ते पाणी १२ ते १५ फुटांवरून खाली पडते. तेथे फेस निर्माण होत आहे. हा फेस शंभर ते दीडशे मीटर अंतरापर्यंत कायम राहत आहे.
२) यापूर्वी घेतलेल्या नमुन्यांमधील पाण्यात साबण अर्थात डिटर्जंटयुक्त रसायन आढळून आले आहे. ज्यावेळी बंधाऱ्यातून पाणी पडते, त्यावेळी फेस येतो. त्यामुळे सध्या येणारा फेस डिटर्जंटचा असावा, असा प्राथमिक अंदाज.
येथील नमुने घेतले...
आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत नदी फेसाळली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळवडे, चिंबळी, मोशी, डुडुळगाव आणि आळंदी बंधारा परिसरांतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचा अहवाल येणार आहे.
काय आहेत उपाययोजना
१) आळंदीतील बंधाऱ्यातून यापूर्वी पिण्याचे पाणी उचलले जात असे. मात्र, हा बंधारा वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यात गाळ साचला आहे. त्यातील पाणी सोडण्याची गरज आहे.
२) इंद्रायणी नदीच्या एका बाजूने आळंदी, मोई, चिंबळी, निघोजे, इंदोरी अशी गावी येतात. दुसऱ्या बाजूला तळेगाव दाभाडे, देहूगाव, तळवडे, मोशी, चिखल, डुडुळगाव येतात. महापालिका, पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचे क्षेत्र येते. महापालिकेच्या परिसरातील सांडपाण्यावर नियंत्रण आणले गेले असले तरी पीएमआरडीए व नगरपालिका हद्दीतून थेट नदीत सांडपाणी सोडले जात आहे. ते रोखणे गरजेचे आहे.
३) पीएमआरडीए हद्दीतील गावातील गावांनी मैला शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्याची गरज आहे.
इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत तक्रारी आल्यानंतर तातडीने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक संबंधित भागामध्ये गेले. आठवड्याभरापासून पाण्याचे नमुने घेत आहोत. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सकृतदर्शनी फेस डिटर्जंटमुळे येत असावा, असे वाटते. अहवाल आल्यानंतर नदी कशामुळे फेसाळत आहे, हे समजून येईल.
- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ