इंद्रायणीपात्र कोरडे, पाणी सोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:39 AM2018-04-05T02:39:03+5:302018-04-05T02:39:03+5:30
आळंदी - मरकळ येथील इंद्रायणी नदी पात्र पाण्या अभावी कोरडे आहे. पाणी नदीत सोडण्याची मागणी पुणे पाटबंधारे विभागाकडे मरकळचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी केली आहे.
मरकळ परिसरातून वाहणा-या इंद्रायणी नदी पात्रात पाणी नसल्याने नगदी पिके जळू लागली आहेत. जनावरांना पिण्याचे पाण्यासाठी नदी पात्रात पाणी सोडण्याची गरज असल्याने तात्काळ पाणी सोडण्याची मागणी टाकळकर यांनी केली आहे.
इंद्रायणी नदी पात्रात वाडिवळे अथवा आंध्रा बंधा-यातून पाणी सोडले तर पिकांना तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच जलस्रोत वाढतील असे त्यांनी सांगितले. मरकळ परिसरात शेताचे उत्पन्न घेतले जात आहे.
उसाचे मोठे क्षेत्र असल्याने येथील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी बंधा-याचे बर्गे (ढापे) बसविण्यासह ढापे देखभाल दुरुस्ती व बंधाऱ्याचे मजबुतीकरण करण्याची गरज आहे.
पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतक-यांचे वतीने पोलीस पाटील टाकळकर यांनी केली आहे. आळंदी इंद्रायणी नदीत पाणी पोहचले मरकळ प्रतीक्षेत दरम्यान इंद्रायणी नदी वरील धरणातून सोडण्यात आलेले पाणी आळंदी नदी पात्रात पोहचले असून उद्या गुरुवार (दि. ५) उशिरापर्यंत मरकळ बंधा-यात पाणी येईल, असे मोशी पाटबंधारे विभागाचे गदादे यांनी सांगितले.
पाणी गळती रोखल्यास साठा वाढण्यास मदत
पाणीगळती रोखल्यास पाणीसाठा वाढणार आहे.एप्रिलचे पहिल्याच आठवड्यात नदीपात्रात पाणी नसल्याने शेतमाल उत्पादकांनी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. इंद्रायणी नदीवर परिसरात अनेक शेतीपंप असून सुमारे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत पाईपलाईन करून आणले आहे. ऊस व इतर पिकांना पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत.