इंद्रायणीतीरी फुलला भावभक्तीचा मळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:52 AM2019-03-23T02:52:09+5:302019-03-23T02:52:44+5:30

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७१ व्या वैकुंठगमन बीजोत्सव तुकाराम बीज सोहळ्यास लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. इंद्रायणीतीर हरिगजराने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. देहूकरांनी भाविकांची मनोभावे सेवा केली.

Indrayaniyri fula of Bhavbhakti Mala | इंद्रायणीतीरी फुलला भावभक्तीचा मळा

इंद्रायणीतीरी फुलला भावभक्तीचा मळा

Next

देहूगाव - जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७१ व्या वैकुंठगमन बीजोत्सव तुकाराम बीज सोहळ्यास लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. इंद्रायणीतीर हरिगजराने इंद्रायणीतीर भक्तिमय झाला होता. देहूकरांनी भाविकांची मनोभावे सेवा केली.
श्रीक्षेत्र देहूगाव गोपाळपुरा येथील वैकुंठगमन मंदिराच्या आवारात दुपारी बारा वाजता मनोभावे अभिवादन करीत नांदुरकीच्या झाडावर अबीर बुक्का व तुळशी पाने आणि फुलांची उधळण केली. दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ
आणि वीणा-टाळ-मृदंग
यांच्या साथीत भजन-कीर्तन व हरिनामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून गेला होता.
यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी पहाटे चारपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी गोपाळपुराकडे वेगाने जात होते.
बीज सोहळ्यानिमित्त शिळा मंदिरात विश्वस्त सुनील दिगंबर मोरे, अशोक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. वैकुंठगमन मंदिरातील श्री संत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त सुनील दामोदर मोरे व अभिजित मोरे व विठ्ठल मोरे यांच्या हस्ते महापूजा पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. संस्थानच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्यात आणि गोपाळपुरा येथील श्री संत तुकाराममहाराज मंदिर आणि नांदुरकीच्या झाडाखालील पारावर फुलांची आकर्षक सजावट केली होती. या नैमित्तिक महापूजेनंतर भाविकांना मुख्य मंदिरात, शिळामंदिर व वैकुंठगमन मंदिरात दर्शनाला सोडण्यात आले.
पालखीसाठी उपस्थित मान्यवर
या सोहळ्यास उपस्थित असलेले आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, पार्थ पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अपर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या हस्ते वैकुंठगमन मंदिरातील संत तुकाराममहाराज मंदिरात आरती झाली. या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, शाखा अभियंता बाळासाहेब मखरे, माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, सुहास गोलांडे, सरपंच ज्योती टिळेकर, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, हेमा मोर, सुनीता टिळेकर, उपसरपंच
नीलेश घनवट, सचिन साळुंके, सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री संत तुकाराममहाराज संस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब (पंढरीनाथ) महाराज मोरे व सर्व विश्वस्त आदी उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजल्यानंतर पालखी वैकुंठगमन मंदिरामधून पुन्हा देऊळवाड्यात आल्यानंतर विसावली.

भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी
इंद्रायणी नदीकिनारी भागात, वाहतुकीचा ताण असलेल्या देहू-आळंदी रस्ता, देहू-देहूरोड रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाºयावर ताण आलेला जाणवत होता. तरीही ते भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तयार होते. येथील आंबेडकर चौकात ध्वनिक्षेपकावर नागरिकांना सूचना दिल्या जात होत्या. नदीला पाटबंधारे विभागाने पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी होते. येथे भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून काही पोलिसांची नेमणूक करून सूचना सांगितल्या जात होत्या. त्यामुळे भाविक सतर्क झाले होते.

येथील मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर पालखी पुन्हा मुख्य मंदिराकडे रवाना झाली. हा बीजोत्सोव सोहळा पार पडल्यानंतर येथील मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हा सोहळा दिडच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा घालुन संपन्न झाला. देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिरात प्रथे प्रमाणे उपस्थित दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना मानाचे फेटे व नारळ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले.

Web Title: Indrayaniyri fula of Bhavbhakti Mala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.