उद्योगनगरीत मल्टिफ्लोअर इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स
By admin | Published: October 13, 2016 01:33 AM2016-10-13T01:33:25+5:302016-10-13T01:33:25+5:30
राज्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या उद्योगनरीत औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी लघु, सूक्ष्म उद्योजक आणि मध्यम व इतर उद्योगांंची भरभराट होण्यासाठी
पिंपरी : राज्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या उद्योगनरीत औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी लघु, सूक्ष्म उद्योजक आणि मध्यम व इतर उद्योगांंची भरभराट होण्यासाठी राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मल्टिफ्लोअर कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना आवश्यक असणारी जागेऐवजी त्यांना व्यवसाय करण्यासाठी थेट बांधलेला गाळा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे़
गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनेक छोटे व्यावसायिक अपुऱ्या जागा आणि असुविधांमुळे त्रस्त झाले होते़ एमआयडीसीच्या जागेत छोटासा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते़ मात्र, शहरातील विविध संघटनांनी सरकारने लघु, सूक्ष्म, मध्यम आणि इतर उद्योगांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने केली होती़ त्यामुळे सरकारने पिंपरी -चिंचवड औद्योगिकनगरीत मल्टिफ्लोअर कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाने अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लघु उद्योजकांच्या व्यावसायिक जागेसंदर्भात अडचण दूर होणार आहे़ एमआयडीसीत सध्याच्या जागा अपुरी पडत असल्यामुळे शासनाच्या वतीने उपलब्ध जागेवर मोठ्या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे़ त्यामध्ये लघु, मध्यम, सूक्ष्म उद्योजकांना ९९ वर्षांच्या करारावर गाळा देण्यात येणार आहे़
या योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या जागेत मल्टिफ्लोअर इमारतीची निर्मिती करण्यात येणार असून, छोट्या उद्योजकाला कमीत कमी भाड्याच्या दरात गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत़ गेल्या काही दिवसांपासून लघुु उद्योजकांना अस्वच्छता, पाण्याची कमतरता, विजेची तारांबळ, रस्त्यांची दुरवस्था यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता़ या अडचणीतून सुटका
होणार असल्यामुळे उद्योजकांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे़ (प्रतिनिधी)