इराणी तरुणीचा महिनाभर घरात डांबून छळ; पुण्यात उद्योगपतीच्या मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:40 PM2018-12-25T13:40:33+5:302018-12-25T14:16:44+5:30

कोरेगाव पार्कमधील घरात इराणी तरुणीला महिनाभर मारहाण

industrialists son arrested for abusing and beating iranian women | इराणी तरुणीचा महिनाभर घरात डांबून छळ; पुण्यात उद्योगपतीच्या मुलाला अटक

इराणी तरुणीचा महिनाभर घरात डांबून छळ; पुण्यात उद्योगपतीच्या मुलाला अटक

googlenewsNext

पुणे: इराणी तरुणीला घरात डांबून तिचा छळ करणाऱ्या उद्योगपतीच्या मुलाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. धनराज मोरारजी असं अटक करण्यात आलेल्या उद्योगपतीच्या मुलाचं नाव आहे. तो अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. धनराजनं त्याच्या कोरेगाव पार्कमधील घरात एका इराणी तरुणीला जवळपास महिनाभर डांबून ठेवलं होतं. या दरम्यान त्यानं तिला अनेकदा मारहाण केली. 



परवीन घेलाची नावाची 31 वर्षीय तरुणी पुण्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्स करण्यासाठी इराणहून पुण्याला आली होती. तिथे तिची एका मित्राच्या माध्यमातून धनराजशी ओळख झाली. मे महिन्यात तेहरानहून पुण्यात आलेली परवीन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनराजला भेटली. परवीन सुरुवातीला धनराजसोबत अतिशय आनंदात होती. त्यामुळे ती धनराजच्या कोरेगाव पार्क येथील आलिशान घरात राहू लागली. मात्र यानंतर धनराज तिला मारहाण करु लागला. त्यानं तिचा पासपोर्ट, इतर कागदपत्रं आणि मोबाईलदेखील जप्त केला. त्यामुळे परवीनला तिच्यावर होत असलेला अन्याय कोणालाही सांगता आला नाही.



22 डिसेंबरला धनराज त्याच्या एका मित्रासोबत हॉटेलमध्ये गेला. त्यावेळी त्यानं परवीनलादेखील सोबत नेलं होतं. धनराजनं हॉटेलमध्ये परवीनला मारहाण केली. धनराजनं कानशिलात लगावल्यानं परवीनच्या चेहऱ्यावरुन रक्त येऊ लागलं. त्यानंतर धनराज परवीनला घेऊन घरी परतला. त्यावेळी धनराजला एका व्यक्तीशी महत्त्वाचं बोलायचं असल्यानं तो रुमबाहेर गेला.



सुदैवानं त्यावेळी तो परवीनचा मोबाईल न्यायला विसरला. हीच संधी साधत परवीननं तिच्या परिस्थितीची माहिती एका मैत्रिणीला दिली. धनराज व्हॉट्स अॅप, फेसबुकवरुन जाणारे सर्व मेसेज तपासत असल्यानं परवीननं इन्स्टाग्रामच्या मदतीनं तिच्या अवस्थेची माहिती मैत्रिणीला दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परवीनची सुटका केली. 
 

Web Title: industrialists son arrested for abusing and beating iranian women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.