इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात शिशुंची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 02:35 PM2019-12-05T14:35:54+5:302019-12-05T14:41:51+5:30
उपचारासाठी खासगी डॉक्टरांचा भुर्दंड
सागर शिंदे -
इंदापूर : इंदापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात महिलांची प्रसूती विनामूल्य आहे. मात्र नवजात शिशुंना कोणत्याही प्रकारची सुविधा व उपचार नसल्याने बाळाच्या उपचारासाठी हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
रुग्णालयात महिन्याला जवळपास १२० पेक्षा जास्त महिलांची प्रसूती होते. मात्र शिशु आजारी पडल्यावर रुग्णालयातील गैरसोयींमुळे त्याला काही वाईट झाल्यास जबाबदार कोण? शिशु उपचारासाठी खासगी रुग्णालयात १० ते ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. रुग्णालयात बालक जन्मल्यानंतर त्याच्यावर उपचाराची सुविधा नसल्याने, रुग्णालयासमोरील खासगी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. खासगी दवाखान्यात गोरखधंदा चालू असून, त्यामुळे रुग्णालयाचे अधिकारी इकडचा खर्च तिकडे वसूल करत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गफ्फूर सय्यद यांनी केला आहे.
शासकीय उपजिल्हा रुग्णालयात गरीब, गरजू, शिधापत्रिकाधारक तसेच दारिद्र्यरेषेखालील हातावर पोट असलेले लोकच प्रसूतीसाठी येतात. मात्र त्यांना बालकांच्या उपचारासाठी नाहक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. महिला प्रसूती वॉर्डात एकूण पंधरा महिलांचे बेड आहेत. मात्र कावीळ व ताप आलेल्या बालकांना उपचारासाठी रुग्णालयात केवळ एकच फोटोथेरेपी मशिन आहे, तीही बिघडलेल्या स्थितीत आहे. बाकीच्या बालकांना एकच मशिनवर कसा उपचार शक्य नाही. चार नवीन फोटोथेरेपी मशिन खरेदी करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आदेश देऊनही नवीन मशिन का खरेदी केल्या नाहीत? हा संशोधनाचा प्रश्न आहे.
प्रसूती अथवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर नवजात बालकाची प्रकृती बालरोगतज्ज्ञ तपासतात. मात्र तत्काळ उपचाराची गरज पडल्यास त्यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देतात. बाळाला कावीळ झाली आहे, मोफत इलाज पाहिजे असेल तर सोलापूर येथील सिव्हिल अथवा पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करावे लागेल. त्यासाठी मोफत अँब्युलन्ससेवा देण्यात येईल, असे रुग्णांना सांगितले जाते. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईचे दूध आवश्यक असल्याने, प्रसूती व शस्त्रक्रियेमुळे बाळाची आई बेडवरून हलचाल करू शकत नसल्याने, गरीब रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो. उत्कृष्ट प्रसूतीसेवा कार्यक्रमांमध्ये शासनाच्यावतीने इंदापूर रुग्णालयात गौरविले आहे. मात्र सध्या सुविधा नाहीत.
..........
बाळाच्या जिवाची खूप काळजी वाटते
मी ३० नोव्हेंबरपासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. आज चार दिवस झाले माझ्या बाळाला त्रास होत आहे. बाळांच्या डॉक्टरांना बोलवा म्हणून सिस्टर यांना वारंवार सांगावे लागते. मात्र मागील चार दिवसांत केवळ ३ वेळा डॉक्टर विचारून गेले आहेत. काल रात्री ९ वाजता माझे बाळ प्रचंड रडत होते. डॉक्टरांना सांगूनदेखील २ तासांनंतर त्यांनी आम्हांलाच त्यांच्या खासगी दवाखान्यात बोलावून घेतले. मला माझ्या बाळाची खूप काळजी वाटते. येथे डॉक्टर लवकर येत नाहीत.- गौरी साठे, गर्भवती महिला.
..........
आदेश असूनही, गर्भवतींना का सुविधा दिल्या नाहीत?
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी रुग्णालयात भेट दिली होती. रुग्णालयाच्या खात्यात त्यावेळी जवळपास २७ लाख रुपये शिल्लक होते. त्यावेळी त्यांनी अधीक्षकांनी थेट आदेश दिले होते, चार फोटोथेरपी मशिन, चार पाण्याचे फिल्टर कुलर, जनरेटर मशिन, गर्भवतींसाठी गरम पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून नवीन गिझर बसवून घेण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
........
बालकांना चांगला उपचार देण्याचा प्रयत्न करू
उपजिल्हा रुग्णालयात दोन फोटोथेरेपी मशिन उपलब्ध आहेत. महिला विभागात व प्रसूतीगृहात एक मशिन आहे. याबाबत मी वैद्यकीय अधिकारी व महिला परिचारिका यांना सूचना केल्या आहेत. मात्र या रुग्णालयातून खासगी डॉक्टर बाळांना उपचारासाठी त्यांच्याकडे वळवत आहेत, त्याला विरोध केल्यास मला विरोध होतो. मात्र आगामी काळात बालकांना चांगला उपचार देण्याचा
प्रयत्न करू, असे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी सांगितले.