अवसरी खुर्द येथील शिवसृष्टीचे निकृष्ट बांधकाम कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:30+5:302021-09-14T04:13:30+5:30
एसटी स्टँड परिसरात राज्य परिवहन महामंडळाचे असणारे निवारा शेड पाडून ग्रामपंचायतीने शिवसृष्टी बांधण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता असणारे पत्राशेड काढण्यात ...
एसटी स्टँड परिसरात राज्य परिवहन महामंडळाचे असणारे निवारा शेड पाडून ग्रामपंचायतीने शिवसृष्टी बांधण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता असणारे पत्राशेड काढण्यात आले व दीड वर्षापूर्वी पुणे जिल्हा परिषदेकडून आठ लाख 50 हजार रुपये निधी मंजूर करून शिवसृष्टीचे बांधकाम चालू झाले. संबंधित ठेकेदार हा राजकीय पक्ष निगडित असल्याने त्यांनी ग्रामस्थांना न जुमानता मागील दीड वर्षापासून संथगतीने बांधकाम चालू ठेवले आहे. संबंधित ठेकेदाराने बांधकामाला सिमेंटचा वापर कमी केला व बांधकामाला पाणी कमी मारल्यामुळे चालू बांधकामाची भिंत पडत असल्याचे बोलले जात आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता शिवसृष्टी परिसराचे बांधकाम चालू असताना कामगार लाकडी बांबू काढत असतानाच शिवसृष्टीचे प्रथम दर्शनीभागाचे बांधकाम जमीनदोस्त झाले. कामावर असलेल्या दोन कामगार पळाल्याने वाचले, अन्यथा मोठा अपघात झाला असता. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अवसरी खुर्द गावच्या विविध विकासकामांसाठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करतात. ठेकेदार हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व ठेकेदारांना राजकीय कार्यकर्त्याचा वरदहस्त असल्याने ठेकेदार ग्रामपंचायतीला जुमानत नाही. ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याने गावातील कामाचा दर्जा खालावला आहे. गावठाण अंतर्गत एसटी स्टॅन्ड ते ग्रामपंचायत, श्री काळभैरवनाथ मंदिर परिसर खालची वेस परिसर व न्हावी वाडा परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचून दुर्गंधी पसरत आहे.
आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाहणी करून याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मंजूर झालेल्या शिवसृष्टीचे बांधकाम चालू असतानाच भिंत पडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.