पुरंदर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; नऊ रुग्णांना या आजाराची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:02 PM2021-06-04T12:02:19+5:302021-06-04T12:02:28+5:30
तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून चार रुग्ण उपचार घेत आहेत. तर दोन रुग्ण आजारमुक्त
नीरा :पुरंदर तालुक्यात आता पर्यंत म्युकरमायकोसिसचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर चार रुग्ण सध्या या आजारावर उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत दोन जण या आजारातून मुक्त झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्वला जाधव यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील १५ एप्रिल नंतर कोरोनाबाधित झालेल्या २,०६१ रुग्णांचा सर्वे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये १६ रुग्ण संशयित आढळले होते. या पैकी नऊ रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे समोर आले होते. यातील सासवड मधील दोन लोकांचा तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. दोन रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. चार रुग्ण पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामूळे आता पुरंदर तालुक्यात सुध्दा म्युकरमायकोसिसचा चांगलाच शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्युकरमायकोसिस आजारा बाबत लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव यांनी केले आहे. हा आजार कोरोना रुग्णांनाच होतो याबाबत कोणीतीही खात्री देता येत नाही. हा आजार यापूर्वी सुद्धा होता. पुरंदरमध्ये आढळलेले रुग्ण पूर्वी कोरोना मुक्त झालेलेच आहेत. त्यामूळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या डोळ्याच्या, नकाच्या व दातांच्या संदर्भात काही समस्या असतील तर प्राथमिक आवस्थेत असतानाच तपासणी करून घ्यावे असा त्यांनी सांगितले आहे.