महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:28 AM2024-05-06T10:28:50+5:302024-05-06T10:29:16+5:30
मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली
पुणे : मोदी सत्तेत आल्यापासून देशात अराजकता पसरली असून, हुकूमशाही पद्धतीने देशाचा कारभार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. महागाई, खासगीकरण, जीएसटी, वेगवेगळ्या त्रासदायक चौकशांमुळे जवळपास १७ लाख भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ डेक्कन नदीपात्रात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, मागील दहा वर्षात देशावरील कर्जाचा आकडा वाढतच चालला आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. भाजपकडून संविधान बदलण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. त्यांचे हे कट कारस्थान हाणून पाडण्यासाठी आणि संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करण्याची संधी मतदारांना आली आहे. 'वंचित'ने सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन त्यांना उमेदवारी देत मुख्य प्रवाहात आणले आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राजकारणाला नागरिक कंटाळलेले आहे. त्यामुळे आपल्याला उद्याच्या भारतासाठी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी १०० टक्के मतदान करा. आपल्या मतातून निश्चितच बदल घडेल.
वसंत मोरे म्हणाले, रोड रोलरच्या माध्यमातून पुण्यातील खड्डे बुजवायचे आहे. सत्ता असताना भाजपने पुणे शहराला काय दिले? भाजपने पुणेकरांना फक्त गाजर दाखवले. शहरातील समस्या दूर न करता पुणेकरांना खड्ड्यात घालण्याचे काम केले. नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांची लूट करण्यात येत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली सरण रचण्याचे काम सुरू आहे. धर्माच्या नावाखाली मत न मागता आतापर्यंत केलेल्या कामाच्या नावावर भाजपने मते मागावी.
मेट्रो म्हणजे वाया गेलेली इन्व्हेस्टमेंट
पुण्यात पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नांवर काम झाले नाही. मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली. एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्या विकल्या. देशावरील कर्जात वाढ झाली आहे. त्यात पुण्याची मेट्रो म्हणजे वाया गेलेली इन्व्हेस्टमेंट असून, मेट्रोमुळे कर्जात वाढच झाली आहे. एकीकडे मेट्रोचा गाजावाजा करतात आणि दुसरीकडे रेल्वेचे खासगीकरण केले जात आहे.