सणासुदीच्या तोंडावर महागाईने मोडले सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 11:56 AM2020-10-08T11:56:40+5:302020-10-08T12:15:04+5:30
सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा दसरा-दिवाळीच्या सणावर परिणाम होणार..
पुणे : ऐन सणासुदीच्या तोडावर जीवनावश्यक, खाद्यपदार्थ, भाजीपाला, कांदा - बटाटा आदी वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. कोरोनामुळे बहुतेक सर्वच स्तरांतील लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्यानंतर वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडेच मोडले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट उभे आहे. यामुळे हजारो-लाखो लोकांचे जाॅब गेले असून, लाखो लोकांच्या पगारामध्ये कपात झाली आहे. त्यात वाढलेल्या महागाईमुळे नागरिक अधिकच हैराण झाले आहेत. खाद्यतेल, खोबरे, तुर डाळ, चनाडाळ, भगर आदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा दसरा-दिवाळीच्या सणावर परिणाम होणार होणार आहे .
तीन-चार महिन्यांपूर्वी आवाक्यात आलेले दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. खाद्यतेलाचा १५ किलोचा डबा 1550 वरून थेट 1730-1750 वर जाऊन पोहचले आहेत. दररोजच्या जेवणातील तुरडाळ तर तब्बल 90-95 रुपयांवरून थेट 120 रुपये किलोच्या घरामध्ये गेले आहे. खोबर 140 रुपये किलो वरून 160 वर, चणाडाळ 50-55 वरून 75 रुपयांवर पोहचले आहे. शेंगदाणे दाखील 120 रुपये किलो झाले आहेत. भगर 80 रुपयावरून 95 पर्यंत वाढले आहे. तर भिजीपाला, कांदा-बटाटा या अत्यावश्यक वस्तूचे दर तर आवाच्या सावा वाढले आहे. यामध्ये यंदा मान्सून चांगला असल्याने गहू, ज्वारी, तांदूळ आणि अन्य कडधान्यांचे दर मात्र अद्याप स्थिर आहेत. या सर्व महागाईमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. त्यातच पेट्रोल व डिझेलचे दरही वाढले होते. यामुळे चोहोबाजूंनी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.
...
खाद्यतेलाचे दर 180 रुपयांनी वाढ
दसरा- दिवाळीच्या तोडावर खाद्यतेलाच्या 15 किलोच्या डब्यामागे तब्बल 180 रुपयांची वाढ झाली असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कोथरूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व किरकोळ मालाचे व्यापारी सुनील घेईलोत यांनी सांगितले. यामुळे यंदाच्या सणासुदीवर महागाईची सावट असणार हे नक्की.
----
अशी झाली दर वाढ ( प्रतिकिलो)
खाद्यपदार्थ जुनचे दर ऑक्टोबरचे दर
तेलडबा( 15 किलो) 1550 1730
तूरडाळ 90-95 120
चणाडाळ 55 75
खोबरे 140 160
भगर 80 95
कांदा 30-35 40-50
बटाटा 20-25 35-40
भाजीपाला गड्डी 10-15 20-25
गहू 30-32 25
ज्वारी स्थिर स्थिर