महागाईचा फटका छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना; वडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या वाढल्या किमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:00 IST2025-01-04T13:00:00+5:302025-01-04T13:00:34+5:30

नववर्षातच हॉटेलसह हातगाड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थांच्या किमतीत वाढ केल्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

Inflation hits small and big hoteliers; Prices of food items including vada pav, parathas have increased | महागाईचा फटका छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना; वडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या वाढल्या किमती

महागाईचा फटका छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना; वडापाव, पराठ्यासह पदार्थांच्या वाढल्या किमती

पुणे : शनिवार-रविवार आला की पुण्यातील विविध भागांतील रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि हातगाड्यांवर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र पुणेकरांना आता जिभेचे लाड थांबवावे लागण्याची शक्यता आहे. कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नववर्षातच हॉटेलसह हातगाड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थांच्या किमतीत वाढ केल्याचा फटका खवय्यांना बसणार आहे.

तांदूळ, गहू, ज्वारी किंवा कडधान्याचे भाव वाढले, तर हॉटेल व्यावसायिकांना काय फरक पडतो? त्याचा भार तर ग्राहकांच्या खिशाला पडतो. असे मानले जात होते. मात्र सर्वसामान्यांप्रमाणे महागाईचा फटका हॉटेल व्यवसायालादेखील बसत आहे. मागील महिन्यांपासून एक महिन्यांच्या कालावधीत कडधान्यांमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांचे दरही प्रती किलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत, तर तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींनी शंभरी पार केली आहे. इतकेच काय तर तेलाचे भाव २ ते ३ रुपयांनी काहीसे कमी झाले असले तरी तेलाचे भाव ही १ लिटर १४० ते १४५ रुपये झाले आहेत. कांद्याच्या भाववाढीने हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

भाजी किंवा वडापाव भाजी या पदार्थांमध्ये कांदा लागत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी वडापावच्या दरात ३ ते पाच रुपयांनी वाढ केली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे ५ ते ७ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. खाणावळीमध्येही काही पदार्थ महागले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.

खानावळीचे दर वाढले :

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतात हॉटेल व खानावळ तसेच घरगुती खानावळ चालकांनी दरात वाढ केली असून, हे दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आता घरगुती खानावळीमध्ये जेवण करणे अवघड झाले आहे. घरगुती खानावळ राइस प्लेट दर ७० वरून ९० रुपये, तर हॉटेलमधील ११० रुपये १३० रुपये झाल्याने वाढत्या महागाईला सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 

महागाईचा फटका हॉटेल व्यावसायिकांनादेखील बसला आहे. ४ ते ५ टक्क्यांपर्यंतची महागाई हॉटेलचालक सहन करू शकतात. मात्र सध्या १० ते १५ टक्क्यांनी गोष्टी महागल्या आहेत. कडधान्ये, पालेभाज्या महाग झाल्या असून, हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा. सध्या कांद्याचे भावदेखील वाढलेले आहेत. बटाट्यांच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने हॉटेलचालकांना हे परवडणारे नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये दर वाढ करणे हाच पर्याय आहे. - गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशन

Web Title: Inflation hits small and big hoteliers; Prices of food items including vada pav, parathas have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.