शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:09 PM2022-12-04T15:09:05+5:302022-12-04T15:09:17+5:30

एकूण २५७७ स्क्वेअरफूट घर असून या घराला अंदाजे १ कोटी रुपये खर्च आला

Influence of Shivaji Maharaj thoughts A fort-like house built by a young man | शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर

शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर

googlenewsNext

प्रकाश शेलार

केडगाव/पुणे : खामगाव (ता. दौंड) येथील शिवप्रेमी युवकाने हुबेहूब ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असणारे घर बांधले आहे. पुणे जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने घर पाहण्यासाठी अनेक शिवप्रेमींची गर्दी होत आहे. खामगाव घरातील गाडीमोडीवरून तांबेवाडीकडे जाताना रस्त्याच्या डावीकडे असणारे घर प्रवाशांचे सहज लक्ष वेधून घेत आहे.

नीलेश पंढरीनाथ जगताप या व्यवसायाने पशुवैद्य असणाऱ्या युवकाने हे घर बांधले आहे. घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणारा चिरा जांभा दगड वापरण्यात आला आहे. सदर दगड पावस जिल्हा रत्नागिरी येथून आणण्यात आला आहे. चारही बाजूला बुरुंजांचा आकार देण्यात आला आहे. बाहेरील बाजूस कंदिलाच्या आकाराचे दिवे बसवण्यात आले आहेत. प्रवेशद्वारापाशी स्वागत कमान बांधण्यात आली आहे. दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा महाकाय आहे. कडेने बगीचा फुलवण्यात आला आहे.

समोर पारंपरिक तुळशी वृंदावन बांधण्यात आले आहे. एकूण २५७७ स्क्वेअरफूट घर असून या घराला अंदाजे १ कोटी रुपये खर्च आला आहे. घर बांधण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला. घराच्या आतील बाजूस जुन्या पारंपरिक वाड्याचा लूक देण्यात आला आहे. आतील भिंतीस ढोलपुरी दगड वापरण्यात आला आहे. छतावरती कौलारू बांधकाम केले आहे. घराच्या मधोमध मोकळी जागा ठेवली असून चारही बाजूने छताला उतार देण्यात आला आहे. कुटुंबीयांना घराच्या आतमध्ये ऊन, वारा ,पाऊस अनुभवता यावा हा त्यामागचा उद्देश आहे.

घराच्या आतमध्ये देवघर, सभागृह, ३ बेड, किचन, स्टोअर रूम, बाथरूम एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील वास्तूप्रमाणे बांधण्यात आल्या आहेत. किचनमध्ये धूर बाहेर जाण्यासाठी आयलॅंड चिमणी व अत्याधुनिक बेल कॅमेरा बसवण्यात आला आहे.

यासंदर्भात नीलेश जगताप म्हणाले की, मला लहानपणापासून किल्ले पाहण्याची आवड होती. शिवाजी महाराजांची अनेक चरित्रे वाचण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावरती असल्याने मी किल्ल्याप्रमाणे घर बांधण्याचा निर्णय घेतला. आतील बाजूस एखाद्या वाड्याप्रमाणे तर प्रत्येक खोली पंचतारांकित वास्तूप्रमाणे बनवली आहे. यावेळी जगताप यांच्या पत्नी जान्हवी, मुलगी तपस्या व मुलगा प्रणव उपस्थित होते.

Web Title: Influence of Shivaji Maharaj thoughts A fort-like house built by a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.