भोर तालुक्यामधील रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:12 AM2018-12-26T00:12:48+5:302018-12-26T00:15:01+5:30
रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून तीन ते चार वेळा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
नेरे : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यापासून तीन ते चार वेळा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित हवामानामुळे रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा, मसूर व हजारो एकरावर लागण केलेला कांदा या पिकांवर तांबेरा व चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने भोर तालुक्यातील बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे.
खरीप हंगामातही पावसाने नियमितपणा न दाखविल्याने उत्पादन समाधानकारक मिळाले नव्हते. आता रब्बी हंगामातही हातातोंडाशी आलेली पिके या हवामानाच्या लहरीपणामुळे वाया जाणार की काय, या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे.
हिवाळा चालू होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले; मात्र या दोन महिन्यांत थंडीचे दिवस असतानाही नागरिकांना मोजकेच दिवस थंडी अनुभवायला मिळाली आहे. मागील आठवड्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला होता. याचा फायदा रब्बी पिकांना होऊन पिकांची जोमाने वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामान तयार झाल्याने ज्वारीवर चिकटा व गहू, कांदा यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
खरिपात शेवटच्या टप्प्यात हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया गेली होती. तीच अवस्था रब्बीतील पिकांची होण्याची दाट शक्यता असल्याचे या दूषित हवामानामुळे दिसून येते, अशी अवस्था वर्षभर होत राहिली तर नशिबी फक्त कष्टच येतात. त्यामुळे शेतकऱ्याने जगायचे तरी कसे? असे धावडी (ता. भोर) येथील प्रगतिशील शेतकरी अमित दरेकर यांनी विचारले.