‘पुणे महानगर’च्या मतदारयादीवर महिलांचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:34+5:302021-08-18T04:16:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक घेऊन तीस सदस्यांची निवड करण्यात येणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडणूक घेऊन तीस सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामधील ग्रामीण मतदारसंघ (जिल्हा परिषद) ५८१, लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) ११४ आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगरपालिका) २८५ असे एकूण ९८० मतदारांची प्रारूप मतदारयादी मंगळवारी (दि. १७) प्रसिद्ध करण्यात आली. यात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ५२२ मतदार महिला आहेत.
पुणे महानगर नियोजन समिती निवडणुकीची प्रारूप मतदारयादी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात तसेच www.divcommpune.in या संकेतस्थळावर तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदांच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यादीत समाविष्ट असलेल्या मतदारास २० ऑगस्टपर्यंत आक्षेप घेता येणार आहे किंवा उणिवा, चुका दुरुस्तीची संधी मिळणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विधानभवन येथे प्रत्यक्षरीत्या किंवा pmpcelection2021@gmail.com या ईमेल आयडीवर अर्ज करता येईल.