पीपीपी मॉडेलमधील १२ रस्ते अन् दोन पुलांची माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:09 AM2021-01-17T04:09:58+5:302021-01-17T04:09:58+5:30
पुणे : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून (पीपीपी) विकसित केल्या जाणाऱ्या १२ रस्ते अन् दोन उड्डाणपुलांसाठी सल्लागार नियुक्त करण्यास मनसेने विरोध ...
पुणे : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून (पीपीपी) विकसित केल्या जाणाऱ्या १२ रस्ते अन् दोन उड्डाणपुलांसाठी सल्लागार नियुक्त करण्यास मनसेने विरोध केला आहे. याबाबत प्रशासनाकडून काही खुलासे आणि माहिती मागविण्यात आली असून, समाधानकारक माहिती न दिल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
मनसेचे नेते बाबू वागस्कर, किशोर शिंदे, गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्थायी समितीने पीपीपी तत्वावर १२ रस्ते आणि दोन पूल विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु, अंदाजपत्रकात तरतूद केलेले बाणेर, हडपसर, लोहगाव येथील रस्ते या प्रस्तावातून वगळण्यात का आले ? खराडीमधील बांधकाम व्यावसायिकांनी पूल, रस्ते विकसित करण्याची तयारी दाखविली होती. हा भाग पालिका हद्दीत येताच त्यांनी भूमिका बदलली आहे. या भागातील पूल आणि रस्त्यांसाठी सहाशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एवढे पैसे पालिकेकडे आहेत काय ? असा सवाल मनसेने केला.
मुंढवा ते बंडगार्डन असा नदीकाठचा रस्ता बदलून स्थायी समितीच्या प्रस्तावात या ठिकाणी उड्डाणपुल दाखविण्यात आला आहे. हा बदल करताना बैठकी झाली नाही. बैठक झाली असेल तर बैठकीतील मुद्दे आणि नोंदी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.