विवाह समारंभात ५० पेक्षा अधिकची गर्दी कळवा व बक्षीस मिळवा: मिलिंद मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:58+5:302021-03-17T04:11:58+5:30
नीरा : विवाह समारंभातील उपस्थितीची अट कागदावरच. कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष : कठोर कारवाईची मागणी या मथळ्याखाली . ...
नीरा : विवाह समारंभातील उपस्थितीची अट कागदावरच. कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष : कठोर कारवाईची मागणी या मथळ्याखाली . ‘लोकमत’मध्ये रविवार १४ रोजी बातमी आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
कोरोना संसर्ग वाढीची अनेक कारणे आहेत. त्यापैकी विवाह समारंभ व घरगुती धार्मिक कार्यक्रम ही सर्वाधिक डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे पोलीस पोहचून कारवाई करतीलच परंतु, जवळपासच्या नागरिकांनी समाजहितासाठी जागृत व्हावे व ५० पेक्षा अधिक लोक एकत्र दिसतील, ते ठिकाण कळवा आणि नाव गुप्त राखत पोलिसांचे योग्य बक्षीस मिळवा, असे जाहीर आवाहन जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सासवड येथे माध्यमांशी बोलताना केले.
मोहिते वार्षिक तपासणीनिमित्त सासवड पोलीस ठाण्यात आले होते. त्यानिमित्त बोलताना म्हणाले कुठल्याही विवाह समारंभात बंधने सोडून नियम तोडून गर्दी केली जात आहे. त्यामुळे दोनशेची मर्यादा आता बंदिस्त मंगल कार्यालयात वधू व वराकडील मिळून ५० वर व खुल्या जागेत दोन्ही कडील मिळून १०० वर आणली आहे. त्यापेक्षा एक जरी नागरिक जास्त असेल तर वधू व वर पिता, मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक यांच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश बजावले आहेत.
प्रत्येक विवाहाचे फोटो, व्हिडीओ शूटिंग, केटरिंगची आॅर्डर तपासूण नंतर शंका वाटली तर खटला दाखल करता येणार आहे. कार्यालयाच्या पहिल्या कारवाईनंतर पुन्हा कारवाईची वेळ आली तर वर वधू पित्यांवर खटला व मंगल कार्यालयाच्या मालकावरच गुन्हा दाखल करून कार्यालयास टाळे ठोकण्याची पोलीस यंत्रणेस परवानगी देण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी विवाह समारंभातील गर्दी रोखण्यावर हयगय करू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, असेही मोहिते बजवण्यास विसरले नाहीत. यावेळी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, राहुल घुगे, महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरांदे आदी उपस्थित होते.
आवश्यक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची पोलिसांनी मदत घ्यावी.
यात्रा, जत्रा व हाॅटेल व्यावसायिकांवर पोलिसांची नजर आहे
गावोगावी यात्रा-जत्रा हंगाम सुरू होत असला तरी हा सारा प्रकार महामारीमुळे रद्द आहे. कोणी चोरून जरी यात्रा-जत्रा केली, गर्दी केली, तर पोलीसांची करडी नजर त्यावर राहील. सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटाझर वापर यावर लक्ष देताना कारवाईची तीव्रता वाढवा, असे आदेश दिल्याचेही मिलिंद मोहिते यांनी सांगितले हाॅटेल, ढाबे यांना कोरोनाचे सारे नियम पाळून क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांसाठी परवानगी दिली आहे. तिथे रोज पोलीस भेट देतील व कार्यवाही अपेक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना समोरासमोर बजावले.