प्रसारमाध्यमांना माहिती द्याल, तर ‘खबरदार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:12+5:302021-01-16T04:15:12+5:30
पुणे : ‘यापुढे प्रसार माध्यमांना माहिती दिली, तर सेवा नियमावलीचा भंग केला, म्हणून कडक कारवाई करण्यात येईल,’ असा आदेश ...
पुणे : ‘यापुढे प्रसार माध्यमांना माहिती दिली, तर सेवा नियमावलीचा भंग केला, म्हणून कडक कारवाई करण्यात येईल,’ असा आदेश पालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी काढला आहे. सत्ताधारी पदाधिकारी आणि वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी यापुढे कोणतीही माहिती पूर्वपरवानगीशिवाय देऊ नये, असे त्यांनी नमूद केले आहे. या आदेशाच्या आडून डॉ.भारती कोणता ‘कारभार’ लपवू इच्छित आहेत, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
आरोग्य विभागाला दरवर्षी ३०० कोटींपेक्षा अधिक तरतूद मिळते. यंदा शहरी गरीब योजनेला वर्गीकरणाद्वारे कोट्यवधींचा निधी मिळाला, तर कोरोनामुळे आरोग्यावरील खर्चासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात आलेला आहे. कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे. त्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. लसीकरणाच्या नियोजनामध्येही आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.
याविषयी प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होताच, सत्ताधारी भाजपा आणि पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य प्रमुखांसह विभागाच्या कामाकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. मात्र, आरोग्य विभागाकडून सुधारणेऐवजी सहकारी अधिकाऱ्यांना दर्डावत त्यांनाच माध्यमांशी बोलण्यावर मर्यादा आणल्या जात आहेत.
----
आरोग्य विभागाचे सहायक अधिकारी आणि अन्य अधिकारी माध्यमांना चुकीची माहिती देत असल्याचे आदेशात डॉ.भारती यांनी नमूद केले आहे. अर्धवट माहितीमधून पालिकेची बदनामी होत असल्याचा साक्षात्कार डॉ.भारती यांना झाला आहे.