धान्यपुरवठ्याची माहिती एसएमएसद्वारे
By admin | Published: May 30, 2017 03:12 AM2017-05-30T03:12:37+5:302017-05-30T03:12:37+5:30
ज्या नागरिकांना रेशन देण्यामध्ये दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे, अशा नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाव व मोबाईल
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्या नागरिकांना रेशन देण्यामध्ये दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे, अशा नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाव व मोबाईल क्रमांक दिल्यास त्यावर धान्य उपलब्धतेची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अन्न व नागरी पुरवठा जिल्हानिहाय दक्षता समितीच्या बैठकीमध्ये आमदार नीलम गोऱ्हे यांनी दुकानदारांच्या मनमानी कारभाराकडे लक्ष वेधल्यानंतर पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी हा निर्णय घेतला.
बैठकीदरम्यान गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्य वितरणामध्ये अनियमितता असून, विविध विभागांतून रेशन दुकानातून नागरिकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी असल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्याकडे दिले. भालेदार यांनी तत्काळ कार्यवाही करण्यासाठी शहर नायब तहसीलदार पवार यांना आदेश दिले.
ज्या नागरिकांना रेशन देण्याबाबत दुकानदार टाळाटाळ करतील, त्या नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवावा. जेणेकरून त्यांना धान्य उपलब्ध झाल्याचा संदेश पाठवण्यात येईल. महाराष्ट्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात धान्यपुरवठा वेळेवर होत नसल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले. त्यावर ज्या ठिकाणी अशी समस्या असेल तेथील दुकानदारांना तीन महिन्यांचा आगाऊ धान्यपुरवठा केला जाईल, अशा सूचना देण्यात आल्याचे भालेदार यांनी सांगितले.