अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्यांना दमदाटी

By admin | Published: July 26, 2015 01:41 AM2015-07-26T01:41:23+5:302015-07-26T01:41:23+5:30

खडकीत अवैध दारूधंद्याविषयी पोलिसांना माहिती असतानादेखील ते याकडे काणाडोळा करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी या अवैध धंद्यांबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास

Information about illegal businesses | अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्यांना दमदाटी

अवैध धंद्यांची माहिती देणाऱ्यांना दमदाटी

Next

खडकी : खडकीत अवैध दारूधंद्याविषयी पोलिसांना माहिती असतानादेखील ते याकडे काणाडोळा करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी या अवैध धंद्यांबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धंदेवाइकांकडून दमदाटी करून, दहशत पसरविली जाते. त्यामुळे अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करून अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत. इंदिरानगर वसाहत, तसेच खडकी रेंजहिल्स रोड परिसरात गावठी दारूची सर्रास विक्री होत असते.

ही दारू दुर्गम भागातून पहाटेच्या सुमारास कॅनमध्ये भरून आणली जाते. त्यानंतर ही गावठी दारू मोठ्या बादल्यांमध्ये काढून त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टाकून ती वाढवितात. परिसरात ही दारू प्रामुख्याने इंदिरानगर वसाहतीच्या व रेंजहिल्स पुलाच्या खालील बाजूला ही दारूविक्री केली जाते. विशेष म्हणजे ही विक्री केली जाणारी ठिकाणे येता-जाता कोणाच्याही निदर्शनास सहज येऊ शकतात, अशी आहेत.
खडकी रेल्वे मार्गाजवळ व रेंजहिल्सच्या ए टाईपजवळील नवीन झालेल्या झोपडपट्टीत हा व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायांना अंदाजे ८ ते १० वर्षे झाली आहेत. रेल्वे हद्दीत हा परिसर येत असल्याने हद्दीचा वाद येत असतो. कारवाई नेमकी करणार कोण, या संभ्रमातच अशा लोकांचे फावते. किंबहुना, कोणत्या जागेवर असा व्यवसाय करावा, जेणेकरून कारवाई करण्यात अडथळा येऊ शकतो, यासाठी या खात्यातीलच जाणकार व्यक्तीला हाताशी धरून व्यवसाय थाटला गेला आहे. या संपूर्ण परिसरामध्ये कॅन्टोन्मेंट, लष्कर व रेल्वे असे विभाग अनेक ठिकाणी आढळतात. त्यामुळे विकासाबरोबरच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात अडथळे येतात. या परिसरात येरवडा व वडारवाडी भागातून माल येत असतो. येथे फक्त हातभट्टी मिळत नसून, अनेक नशा करण्यासाठी लागणारा गांजा, चरस इत्यादीही येथे मिळत असतात. बहुतांश प्रमाणात येथे कामगारवर्ग असतो. झोपडपट्टी भागात बिगारी काम करणारे व स्टेशन परिसरात बाहेरून खडकीत कामाला येणारे व्यसनी असतात. रेल्वे स्टेशन असल्याने मोठ्या प्रमाणावर गिऱ्हाईक उपलब्ध होतात. विशेष म्हणजे काही शौकीन तर लोकलचा प्रवास करून येथे दारू ढोसण्यासाठी येतात.
खडकी बाजारातील इंदिरानगर वसाहत, तसेच महादेववाडी आदी ठिकाणी हे व्यवसाय चालतात. इंदिरानगरमध्ये दोन ठिकाणी, तर महादेववाडीमध्ये पूर्वी, तसेच अधूनमधून हा व्यवसाय सुरू असतो. इंदिरानगर झोपडपट्टी भागात बहुतांश लोक येथे येत असतात. हा खूप जुना व्यवसाय खडकीला आहे. या व्यवसायामुळे अनेक भांडणेही येथे होत असतात. परंतु, संपूर्ण परिसरच यांच्या दहशतीखाली असल्याने येथे कुणीही काहीही करू शकतो, असा दुर्दैवी मेसेज समाजात पसरत आहे. येथे झोपडपट्टी नव्हे, तर खडकीतील दारूगोळा कारखान्यातील काही हातभट्टीशौकीनसुद्धा दारू पीत असतात. बहुतांश कामगारवर्ग येथे हजेरी जाऊनच पुढे कामाला जात असतो, तर काही जण कामाहून सुटल्यावर मिळालेला पगार संपवतात. काही जण येथे पिण्यात कमीपणा समजतात, म्हणून पार्सल घेऊन जातात. पार्सल घेऊन जाण्यात लहान मुलांचाही समावेश असतो. पालक आपल्या मुलांना येथे स्वत:हून पाठवतात. त्यामुळे या मुलांनासुद्धा याची माहिती आधीच होते व भविष्यात हीच पिढी या व्यसनांच्या आहारी जात असते. सहज १० ते १५ रुपयांना दारू मिळते, स्वस्त आहे म्हणून काही वेळा आलिशान गाड्यांतून येथे ग्राहक येत असतात. त्यांना या हातभट्टीची सवय झालेली असते. पैसे खूप, परंतु नशा मात्र हातभट्टीच्या दारूचीच, अशी बाब असते. विशेष म्हणजे काही महविद्यालयीन तरुणसुद्धा उत्सुकतेपोटी याची चव चाखताना पाहावयास मिळत आहेत. कमी पैशांत जास्त आनंद, अशी बतावणी हे तरुण करीत असतात. (वार्ताहर)

पोलीस अधीक्षकांचे आदेश धाब्यावर
- पोलीस अधीक्षकांनी पोलिसांच्या मागे अशा अवैध धंदेवाल्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिसांची कारवाई झाली, तरीही हे अवैध धंदेवाले त्यांना जुमानत नाहीत. आज कारवाई केली, तर न्यायालयात जाऊन दंड अथवा होणारी शिक्षा भोगून पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने हे धंदेवाले व्यवसाय सुरू करीत आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क खात्याच्या कारवाईच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. बेकायदा दारूच्या उद्योगाला उत्पादन शुल्क खात्याबरोबरच राजकीय पाठबळही मिळत असल्याने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई ढिली पडत आहे.

Web Title: Information about illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.