मिळकतींची माहिती एका क्लिकवर, शहरातील इमारतींची १९५२ पासूनची मोजमापे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:30 AM2017-09-02T01:30:29+5:302017-09-02T01:30:38+5:30
महापालिकेच्या मिळकत कर विभागाने तब्बल ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले आहे. त्यामुळे आता शहरातील साडेआठ लाख मिळकतींच्या क्षेत्रफळांसहित सर्व लांबीरुंदीची माहिती या विभागाला केवळ एका क्लिकवर मिळेल.
पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने तब्बल ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग केले आहे. त्यामुळे आता शहरातील साडेआठ लाख मिळकतींच्या क्षेत्रफळांसहित सर्व लांबीरुंदीची माहिती या विभागाला केवळ एका क्लिकवर मिळेल. याशिवाय, या विभागाने जवळपास ७० टक्के कामकाजाचे संगणकीकरण केले असून या वर्षी आतापर्यंतच्या एकूण करापैकी तब्बल ४० टक्के कर आॅनलाईन पद्धतीने जमा होत आहे.
वर्षभरापासून महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे संगणकीकरण सुरू आहे. पैसे जमा करून घेण्यापासून ते मिळकती शोधण्यापर्यंत प्रत्येक कामात संगणकाचा वापर होत आहे. आता वर्षभरानंतर त्याचे अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत. शहरातील सन १९५२पासूनच्या सर्व मिळकतींची (इमारतींची) सविस्तर मोजमापे महापालिकेच्या दप्तरी कागदपत्रांच्या स्वरूपात होती. त्या जवळपास ३२ लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या मिळकत कर विभागातील निरीक्षकांना कोणत्याही मालमत्तेचे जुने मोजमाप त्यांच्या मोबाईलवरही मिळू शकते.
मिळकतीत काही वाढीव बांधकाम झाले असेल किंवा बदल केला गेला असेल, तर तोही अपडेट करून घेतला जातो. नव्या मालमत्तांची माहितीही त्यात नियमितपणे जमा करता येते. मोजणीसंबंधीचे बहुतेक वाद त्यामुळे कमी होत आहेत असा, निरीक्षकांचा अनुभव आहे.
याशिवाय, महापालिकेने शहरातील ८ लाख ५० हजारांपैकी सुमारे ७ लाख मिळकतधारकांचे मोबाईल क्रमांक, मेल आयडी जमा केले आहेत. त्यामुळे कोणाचा कर थकला किंवा जमा करण्याची तारीख जवळ आली असेल, तर त्यांना लगेचच मेलवर व मोबाईलवर एसएमएस पाठविला जातो. कर जमा करणाºयांनाही कर जमा झाला म्हणून मोबाईलवर संदेश पाठविला जातो.
या सुविधेमुळेही कर जमा करणाºयांच्या संख्येत चांगली
वाढ झाली आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख उपायुक्त सुहास मापारी यांनी
दिली. वेळेवर लक्षात आणून दिल्यामुळे सुरुवातीच्या तीन महिन्यांतच कराचा सुमारे ३० टक्के भाग जमा होत असल्याचे मापारी यांनी सांगितले.
आॅनलाईन पद्धतीने कर जमा करण्याचीही सुविधा मिळकत कर विभागाने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नागरिकांचे संबंधित कार्यालयात जाणे, रांगेत उभे राहणे, त्यात वेळ घालवणे वाचले आहे. या वेळी आतापर्यंत जमा झालेल्या ७२५ कोटी रुपये करापैकी सुमारे ४०० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने जमा झाल्याची माहिती मापारी यांनी दिली.
याशिवाय, धनादेशाद्वारे
जमा करण्यात येणारी रक्कम वेगळीच आहे. तीही साधारण १०० कोटी रुपयांच्या आसपास
आहे. म्हणजे एकूण जमा रकमेपैकी ५०० कोटी रुपये रोखीने नाही,
तर धनादेश किंवा आॅन लाईन पद्धतीने जमा झाले आहेत.
हे प्रमाण मागील वर्षी अगदीच नगण्य होते. त्यात आता बरीच
मोठी वाढ झाली आहे. अजूनही अनेक मिळकतदार आॅनलाईन पद्धतीने कर जमा करीत आहेत, असे मापारी यांनी सांगितले.
उपग्रहाद्वारे मालमत्तांची मोजणी
१ जीआयएस मॅपिंगद्वारे उपग्रहाच्या साह्याने शहरातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख मिळकती तपासून झाल्या आहेत. त्यात सुमारे ४० हजार मिळकतींनी वाढीव बांधकाम केले आहे; पण त्यांना कराची रक्कम मात्र जुन्याच मोजमापाने पाठवली जात आहे, असे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची नव्याने प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन नव्याने मोजमापे केली जातात.
२ यातून मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असे मापारी यांनी सांगितले. शहरातील सर्व म्हणजे ८ लाख ५० हजार मालमत्ता या पद्धतीने तपासण्यात येणार असून, त्यातून मालमत्तांच्या संख्येत तर वाढ होईलच; शिवाय उत्पनातही सुमारे ४०० कोटी रुपयांची वाढ होईल, असा विश्वास मापारी यांनी व्यक्त केला.