डीएसके गुंतवणुकदारांकडून नमूना फॉर्ममध्ये मागाविली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 04:23 PM2020-03-03T16:23:47+5:302020-03-03T16:33:42+5:30
डीएसके यांच्या मालमत्ता तसेच गाड्यांच्या लिलावातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांकडून त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती एका विशिष्ट तक्त्यात पुणेपोलिसांनी मागवलेली आहे. केलेल्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती या तक्त्यानुसार गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसांकडे सादर करायची आहे.
महाराष्ट्र शासनाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची माहिती मागवण्यासाठी शासन परिपत्रक क्रमांक- एमपीआय १११९/प्र.क्र.०९/पोल-११, दि.- २५ फेब्रुवारी २०१९ नुसार ठेवीची परतफेड मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना जारी केला होता. त्यामूळे यापूर्वी जरी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे आपल्या गुंतवणूकीची माहिती दिली असली तरी आता पुन्हा नव्या नमून्यात ती द्यायची आहे.
याबाबत सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी सांगितले की, डीएसके यांच्या मालमत्ता तसेच गाड्यांच्या लिलावातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गुंतवणुकदारांना हे पैसे परत देण्याचा निर्णय न्यायालयामार्फत होईल. यापूर्वी गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज देताना घरातील एकाच व्यक्तीने अर्ज केला असून त्यात अन्य नातेवाईकांच्या नावाने केलेल्या गुंतवणुकीची माहिती दिली आहे. त्यांना पैसे परत करताना ज्यांच्या नावावर प्रत्यक्ष गुंतवणुक केली आहे. त्यांच्याच बँक खात्यात हे पैसे जमा करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने आम्ही सुधारित अर्ज नमूना तयार केला आहे़ तो जाहीर केला आहे.
गुंतवणुकदारांनी यापूर्वी आपल्या गुंतवणुकीची माहिती पोलिसांना दिली आहे. मात्र, त्यानंतर शासनाने अर्जाचा नमूना जारी केला आहे. त्यामुळे त्या नमून्यानुसार माहिती देणे आवश्यक आहे. यात डी.एस.कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या व भागीदारी संस्थांच्या वतीने गुंतवणूकदारांशी संपर्क करणाऱ्या व्यक्ती, मॅनेजर, एजंट, प्रतिनिधी यापैकी ज्यांनी ठेवीसाठी गुंतवणूकदारास प्रवृत्त केले व अर्जदाराकडून रक्कम स्वीकारली. त्यांचे नाव, पत्ता, संपर्कासाठी उपलब्ध तपशील इत्यादी माहितीही देणे आवश्यक आहे. काही लोक मुद्दाम ठेवीदारांची दिशाभूल करून गुंतवणूकदारांशी संपर्क करणाऱ्या व्यक्ती, मॅनेजर, एजंट, प्रतिनिधी यांची माहिती देउ नका असे सांगत आहेत. त्यांच्यावर विश्वास नये कारण या मध्यस्थांकडून सुद्धा पैसे वसूल होणे गरजेचे आहे. अशा मध्यस्थांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे, असे विजय कुंभार यांनी सांगितले.
पोलिसांनी जारी केलेला फॉर्म संकेतस्थळ व ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहोत. त्यातील मजकूर भरून तो पुणे पोलिसांकडे संबधित गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर द्यावा. तसेच ब्लॉगच्या शेवटी या फॉर्मचा मजकूर आहे. आवश्यक असेल तर तो कॉपी पेस्ट करून वापरता येईल. मात्र पोलिसांच्या फॉर्मशी तो पडताळून पहा असे कुंभार यांनी सांगितले.
़़़़़़़़़
फॉर्म पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध
गुंतवणुकदारांना त्यांचे अर्जासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात येण्याची गरज नाही. आम्ही हा अर्ज पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी बसूनच तो फॉर्म डाऊनलोड करुन भरावा़ असे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी सांगितले.