माहिती अधिकार ग्रंथालय दुर्लक्षित

By admin | Published: December 22, 2016 02:33 AM2016-12-22T02:33:30+5:302016-12-22T02:33:30+5:30

इमारतीचा तिसरा मजला... प्रवेश केल्याक्षणीच दर्शनी भागात दिसते ते खुले ग्रंथालय... उत्सुकतेने आत पाऊल टाकले जाते

Information Rights Library ignored | माहिती अधिकार ग्रंथालय दुर्लक्षित

माहिती अधिकार ग्रंथालय दुर्लक्षित

Next

पुणे : इमारतीचा तिसरा मजला... प्रवेश केल्याक्षणीच दर्शनी भागात दिसते ते खुले ग्रंथालय... उत्सुकतेने आत पाऊल टाकले जाते; पण पदरी पडते ती निराशाच. ग्रंथालयात समोर दिसणारे मोजके संदर्भ ग्रंथ, फाटलेले नकाशे, वाकलेल्या फळ्या असे काहीसे निराशाजनक चित्र पुणे महापालिकेमध्ये पाहायला मिळते.
महापालिकेच्या आवारात असलेल्या खुल्या, सेवकविरहित माहिती अधिकार ग्रंथालयाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे एकंदर प्रकारावरून दिसून येते. येथील संदर्भ ग्रंथांची संख्या अतिशय कमी असून, नव्या पुस्तकांची आवकही झालेली नाही. डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना महापालिकेचे ग्रंथालय मात्र अजूनही दुर्लक्षित आहे.
एकीकडे महापालिकेतर्फे कर्वेनगर, वारजे माळवाडी, वानवडी या भागांमध्ये महिलांसाठी वाचनालये सुरू करण्याचा घाट घालण्यात आला. या ठिकाणी महिलांशी संबंधित पुस्तके, मॉल उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे. मात्र, प्रत्यक्ष आवारात असलेल्या ग्रंथालयाच्या देखभाल-दुरुस्तीकडे काणाडोळा केला जात आहे.
तत्कालीन आयुक्तांच्या संकल्पनेतून खुले माहिती अधिकार ग्रंथालय आकाराला आले. नागरिकांना माहितीच्या अधिकाराशी संबंधित संदर्भ ग्रंथ सहज उपलब्ध व्हावेत, अशी त्यामागील कल्पना होती. त्यानुसार, २०१०मध्ये खुले सेवकविरहित ग्रंथालय आकाराला आले; मात्र येथे ग्रंथपाल, शिपाई अशी व्यवस्था नसल्याने बऱ्याच वाचकांनी याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. नकाशे फाडणे, पुस्तकांमध्ये रेघोट्या ओढणे, एखादे पान फाडून नेणे असे प्रकार होऊ लागले. ही अवस्था लक्षात घेता, दोन वर्षांपूर्वी सेवकाची नेमणूक करण्यात आली. मात्र, ग्रंथालयाला अद्याप प्रशिक्षित ग्रंथपाल मिळालेला
नाही.
ग्रंथालयासाठी महापालिकेच्या आर्थिक धोरणात कोणतीही खास तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व विभागांचे अहवाल, अथवा संदर्भ ग्रंथ उपलब्ध नाहीत. वाहतूक नियोजन, नगर अभियंता, बांधकाम विभाग, जनता संपर्क, विधी, अतिक्रमण अशा मोजक्या विभागांचे अहवाल आणि संदर्भ उपलब्ध आहेत. या ग्रंथालयाचे नूतनीकरण होणे गरजेचे असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच, महापालिकेत स्वतंत्र ग्रंथालय यंत्रणा असावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Information Rights Library ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.