देशोदेशीच्या तंत्रज्ञानाची मिळणार माहिती
By admin | Published: January 13, 2017 01:51 AM2017-01-13T01:51:09+5:302017-01-13T01:51:09+5:30
बारामतीमध्ये १९ ते २२ जानेवारी दरम्यान दुसरे अंतरराष्ट्रीय कृषिक प्रदर्शन होत आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट
बारामती : बारामतीमध्ये १९ ते २२ जानेवारी दरम्यान दुसरे अंतरराष्ट्रीय कृषिक प्रदर्शन होत आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच वतीने शारदानगरमध्ये हे प्रदर्शन पार पडत आहे. यामध्ये नऊ देशांमधील पीक पद्धती शेतकऱ्यांना अभ्यासता येणार आहेत. परदेशात ज्या तंत्रातून पिके घेतली जातात, ती पद्धत येथे प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
या प्रदर्शनात ११० एकरांवर फुलपिके, भाजीपाला, नगदी पिके, फळबागा यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. भुसार पिके ठिबक सिंचनावर व आधुनिक खत व पाणी व्यवस्थापनात अधिक प्रभावीपणे येऊ शकतात, हे शेतकऱ्यांना पाहता येईल. या प्रदर्शनात थायलंडमध्ये घेतल्या जाणाऱ्या वेलीवरील फळांच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक उभारण्यात आले आहे. थायलंडमध्ये खरबुजासारख्या वेलवर्गीय पिकांचे उत्पादनही पॉलीहाऊसमध्ये केले जाते. साहजिकच तेथे रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. तेथील पद्धत बिगरहंगामाच्या काळात आपल्याकडेही फायदेशीर ठरू शकेल. या हेतूने त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रात्यक्षिक उभारण्यात आले आहे. याशिवाय चीनमध्ये लावली जाणारी मका ही एका एकरात ५० क्विंटलपर्यंत उत्पादन देते. त्याची पीक पद्धत येथे दाखवण्यात आली आहे.
या प्रदर्शनात शेतकऱ्यांना निर्यात कंपन्यांच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणार आहे. निर्यात कंपन्यांशी चर्चा करून शेतकरी त्यांच्याशी थेट करारही करू शकतील. या प्रदर्शनात भाजीपाल्याचा नेदरलॅण्ड पॅटर्नही शेतकऱ्यांना अभ्यासता येईल.
बेल्जिअमसारख्या देशात माती नव्याने निर्माण करता येत नाही म्हणूुन त्या देशाने माती निर्जंतुकीकरणाचे मॉडेल साधले आहे, तेच मॉडेल येथे वापरले तर पॉलिहाऊसमध्ये ठराविक काळानंतर माती बदलण्याचा जो खर्च येतो, तो कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. याखेरीज कीडरोग नियंत्रणासाठी अत्यल्प खर्चाचे कीडरोग नियंत्रणाचे थायलंड तंत्रज्ञानही येथे पाहावयास मिळणार आहे. त्याचाही वापर जर शेतीमध्ये झाला तर कीडरोग नियंत्रणासाठी वाढत चाललेला खर्च कमी करण्यास मदत होईल. अलीकडे अवकाळी पाऊस, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षे, डाळिंबांचे अतोनात नुकसान होते. हे टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियन पद्धतीच्या तंत्राचा वापर झाला तर फळबागांचे संरक्षण होऊन बागा कायमच्या हातातून जाण्याचा धोका कमी होणार आहे. (प्रतिनिधी)
आपथराच्या शेतीपासून ते पॉलिटनेलपर्यंत...
ल्याकडे राज्यात पाण्याच्या अतिवापराने जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यांचे वाढते प्रमाण जसे चिंतेचे आहे, तसेच मातीचा पोत बिघडत असल्याने पिकाऊ मातीही कमी पडत आहे. दुसरीकडे कुटुंबांची संख्या वाढत असल्याने जमिनीचे तुकडे कमी होत आहेत आणि शहरी भागातही कमी जागेत भाजीपाला पिकवण्याची पध्दत वाढीस लागली आहे.
या साऱ्यांवर उत्तर म्हणून थरांची शेती हा नवा प्रयोग जन्माला येतो आहे. छोटे कंपार्टमेंट करून एकमेकांवर एक असे भाजीपाल्याच्या पिकांचे थर करून उत्पादन घेणारी थरांची शेतीची पद्धत आहे, त्याचीही माहिती शेतकऱ्यांना अभ्यासता येईल.
याखेरीज संरक्षित शेतीमध्ये पिके पूर्णत: कीडरोगापासून दूर ठेवणारी पॉलीटनेल, पॉलीटनेल हाऊस, नाईट ट्रॅप्स, नॉन ओव्हन पॉली प्रॉपिलीन क्रॉप कव्हर, हायड्रोजल तंत्रज्ञानही शेतकऱ्यांना अभ्यासता येऊ शकेल.