C-DAC | जंगलातील वणवा २ दिवसांनंतर कसा पसरणार तेही कळणार, सीडॅकतर्फे तंत्रज्ञान विकसित
By प्रशांत बिडवे | Published: March 21, 2023 06:14 PM2023-03-21T18:14:42+5:302023-03-21T18:15:35+5:30
सी-डॅकच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजाच्या फायद्यासाठी विकसित केलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली...
पुणे : जंगलात वणवा पेटल्याने वनसंपत्तीचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेते तसेच प्राण्यांनाही जीव गमवावा लागताे. वणवा पेटल्यानंतर ताे पुढील ४८ तासांत जंगलातील काेणत्या क्षेत्रात कसा पसरेल आहे याची संभाव्य माहिती देणारे तंत्रज्ञान सी-डॅकसह देशातील इतर संशाेधन संस्थांनी मिळून विकसित केले आहे. सिक्कीम राज्यात जंगलात सिस्टिमचा प्रयाेग यशस्वी झाला असून त्यामुळे वणव्यामुळे हाेणारे वनसंपत्तीचे संभाव्य नुकसान टाळण्यास मदत हाेणार आहे अशी माहिती सी-डॅकचे कार्यकारी संचालक निवृत्त कर्नल ए.के. नाथ यांनी दिली.
पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र सी-डॅकच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त समाजाच्या फायद्यासाठी विकसित केलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्पादनांची माहिती नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सीडॅकचे महासंचालक ई.मगेश यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले.
सी- डॅक सह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, खरगपूर, आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नाॅलाॅजी सिक्किम यांनी मिळून ‘ फाॅरेस्ट फायर स्प्रेड सिम्युलेशन युसिंग हाई परफाॅर्मन्स कॅम्प्युटिंग सिस्टीम’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जंगलात वणवा पेटताच उपग्रह तसेच वनअधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती दिल्यानंतर ही सिस्टिम पुढील ४८ तासात वणवा जंगलात कसा पसरू शकताे याची पूर्वकल्पना वन सर्वेक्षण विभागाला वेळाेवेळी देईल त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने आग अटाेक्यात आणणे आणि जीवितहानी हाेउ नये यासाठी खबरदारी घेणे साेपे हाेणार आहे. सिक्किम राज्यातील जंगलात दि. २६ ते २८ जानेवारी या कालावधीत या तंत्रज्ञानाचा प्रयाेग यशस्वी झाला आहे. देशातील विविध जंगलातील वनसंपत्तीचा अभ्यास करून त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे.
कशी हाेणार तंत्रज्ञानाची मदत
- वणव्यामुळे संकटात सापडणाऱ्या नागरिकांची वेळीच सुटका करीत जीवितहानी कमी करणे
- अग्निशमन यंत्रणेचा प्रभावी वापर करीत पसरणारी आग अटाेक्यात आणणे
सायबर धाेके परतावण्यासाठी हनीपाॅट फ्रेमवर्क विकसित
सायबर धाेक्यांचे निरीक्षण, विश्लेषण करणे तसेच त्यावर उपाय करण्यासाठी सी-डॅकने ‘हनीपाॅट फ्रेमवर्क’ विकसित केले आहे. देशातील दाेन हजार पेक्षा जास्त संस्थांमध्ये हे तंत्रज्ञान कार्यान्वित केले आहे. तसेच वातावरणातील हल्ले समजून घेण्यासाठी सीआय सुरक्षा प्रशिक्षण किट तयार केली आहे.
साॅफ्टवेअर सिक्युरिटीवर ऑनलाईन काेर्स
संगणक अभियंत्यासाठी सीडॅकच्या वतीने साॅफ्टवेअर सिक्युरिटी वर ऑनलाईन काेर्स सुरू करण्यात आला आहे. हा काेर्स सशुल्क असून दाेन महिने कालावधीत तीस तासांमध्ये विविध ९ माॅड्युल्स शिकविले जातील. अधिक माहितीसाठी https://meghsikshak.in/chariot/ या संकेतस्थळास भेट द्यावी.