सकस आहारासाठी ‘अक्षयपात्र’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 01:53 AM2018-11-16T01:53:15+5:302018-11-16T01:53:40+5:30
मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावामुळे नागपूर, ठाण्यानंतर पुणे शहरात काम
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील मुलांनादेखील सकस आणि पोष्टिक पोषण आहार मिळावा यासाठी ‘सीएसआर’च्या माध्यमातून ‘अक्षयपात्र’ या संस्थेने पुढाकार घेताल आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावानंतर नागपूर, ठाण्यानंतर आता पुणे शहरामध्ये देखील संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यात येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हडपसर, कोंढवा-येवलेवाडी आणि रामटेकडी-वानवडी या तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ३९ शाळांमधील २५ हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’च्या वतीने पोषण आहार देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यासाठी महापालिकेने सर्व शाळांसाठी त्या-त्या भागातील बचत गटांना पोषण आहार पुरविण्याचे काम देण्यात आले. परंतु आता शासनाने सीएसआर निधी अतंर्गत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य शासनाने मेक इन महाराष्ट्र योजनेंतर्गत मोठ्या कंपन्यांना सीएसआरअंतर्गत प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले होते. त्यात अक्षयपात्रनेही महापालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत जानेवारी महिन्यात मुंबईत होणाऱ्या महापरिवर्तन मेळाव्यात महापालिका आणि अक्षयपात्र संस्थेत करार केला जाणार आहे.
४00 बचत गटांची नोंद
महापालिकेकडे तब्बल ४०० हून अधिक बचत गटांनी नोंदी केल्या. त्यापैकी सध्या विविध २०० बचत गटांमार्फत शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो.
यंत्राद्वारे अन्न तयार
महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षयपात्र संस्थेकडून देण्यात येणाºया शालेय पोषण आहाराच्या माहितीसाठी संस्थेचे ठाणे महापालिकेत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. या शिवाय, संस्थेस महंमदवाडी येथे सेंट्रल किचनसाठी एक ते दीड एकर जागा मिळाली असल्याने या ठिकाणी तयार होणारे अन्न हे जवळपास ९० टक्के मानवस्पर्शरहित यंत्रणेद्वारे तयार होते. त्यामुळे मुलांना आरोग्यदायी व सकस पोषण आहार मिळणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.