ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू

By admin | Published: July 10, 2015 01:07 AM2015-07-10T01:07:50+5:302015-07-10T01:07:50+5:30

दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोमाने सुरुवात झाली आहे.

Initiative for Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू

ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू

Next

वासुंदे : दौंड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा व दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला जोमाने सुरुवात झाली आहे.
यामध्ये ज्या ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण गटासाठी खुले आहे, अशा ठिकाणी सर्वांत जास्त रस्सीखेच दिसून येत आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदाच्या जागेसाठीही मोठी चुरस निर्माण झाली आहे. तर गावच्या आखाड्यात नव्याने उतरणाऱ्या नवख्या उमेदवारांचीही संख्या मोठी असल्याने व ज्येष्ठ मंडळीही निवडणुकीसाठी शड्डू ठोकून उभी राहिल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
अशातच काही ठिकाणच्या प्रमुख मंडळींनी गावची एकी व सलोखा जपण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचे प्रस्ताव ठेवून घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली. मात्र, राजकारणातील नवखे व ज्येष्ठ यांच्यामध्ये मेळ बसत नसल्याने व मलाच पाहिजे या अटीवर काही उमेदवार अडून राहिल्याने या बैठकाही निष्फळ ठरत असल्याची चर्चा गावकरी पारावर बसून करत आहेत.
तर काही ठिकाणची सुशिक्षित मंडळीही गावच्या राजकारणात उतरून नवखे व जुने अशांचा ताळमेळ
घालून गावच्या सर्वांगीण विकासाची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, काही इच्छुक
मंडळी इकडून नाही उमेदवारी
मिळाली तर तिकडे जाणार, असा दबाव टाकत असल्याने या गावगाड्याच्या निवडणुकीसाठी
पॅनल तयार करणाऱ्या प्रमुख मंडळींना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. (वार्ताहर)
-----------
हौशे, गवशे व नवशे अशा प्रकारची भूमिका बजावणाऱ्या काही मंडळींना मात्र कोणाला उमेदवारी मिळणार, कोण निवडून येणार, कोण सरपंच होणार याच्याशी काही सोईरसुतक नसून निवडणुकीच्या काळात आपली खायची आणि.... त्याची पण चांगलीच चंगळ होणार असल्याने हीच मंडळी गावच्या चौकाचौकांमध्ये, पारावर बसून हा खूप मोठा, तो लय चांगला अशा गप्पा झोडू लागली आहेत.

Web Title: Initiative for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.